कष्टातून यशस्वी झालेल्या दोन युवकाचा भाकसखेडा चेअरमन च्या वतीने सत्कार!
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील भाकसखेडा या गावातील भवान केरबा खेडकर कांबळे तसेच राम भगवान कांबळे या दोन्ही ग्रामस्थांनी आपल्या आर्थिक बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन कष्टातून यश संपादन करून आज शासकीय सेवेत दाखल झाल्याबद्दल, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक जाधव यांच्या वतीने दोन्हीही तरुणांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. भवान केरबा खेडकर कांबळे हा विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक म्हणून नांदगाव जिल्हा नाशिक येथे निवड झाली. त्यांना वडील नसताना त्यांची आई सरुबाई कांबळे यांनी मोलमजुरी करून आपल्या मुलाला शिक्षण दिले. आपल्या आईचे कष्ट वाया न जाऊ देता मुलगा यांनी विविध परीक्षेत यश संपादन केले, व आज प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून गावातील प्रत्येक नागरिकांना त्याचा अभिमान आहे. त्याचप्रमाणे राम भगवान कांबळे हा विद्यार्थी सुद्धा घरची परिस्थिती बिकट असताना देखील आई-वडिलांच्या मोलमजुरीच्या जीवावर शिक्षण घेत होता. विविध परीक्षेत त्यांनी यश संपादन केले असून आज तो कृषी सहायक म्हणून निवड झालेली आहे. सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे. या दोन्ही युवकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी यश संपादन करावे. असे सत्काराचे वेळी बोलताना चेअरमन विवेक जाधव यांनी गावातील युवकांना सांगितले.
यावेळी भवान व राम यांनी आपले विचार व्यक्त करताना आम्ही शासकीय सेवेत कुठेजरी गेलो तरी आपल्या गावाचे नाव कमी होऊ देणार नाही. यशस्वीपणे सर्वसामान्यांची सेवा करू. विद्यार्थी घडवू व आपल्या गावाचे नाव लौकिक जसा आहे तसा ठेवण्यास आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू. अशी ग्वाही दिली. यावेळी विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक विजय बुरले, सरपंच लिंबाजी खेडकर, राम जाधव, रास्त भाव धान्य दुकान चे चेअरमन सुनील जाधव , नृसिंह जाधव,जोतीराम जाधव, वैजनाथ जाधव, सतिश मोरे, बाबू कांबळे, भीम कांबळे, विष्णुदेव जाधव, साईनाथ खेडकर ,जितेंद्र खेडकर, लखन कांबळे, ओम कांबळे, दयानंद मोरे, मंडळाधिकारी पंडित जाधव व सौ विजया जाधव यासह अनेक नागरिक उपस्थित होते.