गोवंशाची चोरटी वाहतूक, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील वळण रस्त्यावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये पोलिसांनी एक आयशर कंपनीचा टेम्पो पकडला असून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात ग्रामीण पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, दिनांक 16 मार्च रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास एक टेम्पो गोवंशाची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस त्या ठिकाणी जाऊन आयशर कंपनीचा टेम्पो के ए 38- 8641 या क्रमांकाचा टेम्पो तिथे आला होता. त्या टेम्पोमध्ये 12 गोवंश जातीचे जनावरे अत्यंत दाटीवाटीने डांबून ठेवली होती. अत्यंत त्रासदायक अशा पद्धतीने कमी जागेमध्ये क्रूर व निर्दयीपणाची वागणूक देऊन जनावरांना हालचाल ही करता येणार नाही, अशा पद्धतीने डांबून ठेवलेली होती. या तपासणीनंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कांबळे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम उरप्पा कैकाडी टेम्पो चालक (वय 45 वर्ष राहणार जानवळ तालुका जिल्हा बिदर) आणि यशप्पा पुंडलिक हलगे (वय 55 वर्ष राहणार दादापूर तालुका जिल्हा बिदर) या दोघांवर दिनांक 17 मार्च रोजी गुन्हा नोंद क्रमांक 150/ 24 कलम 11 (1) (ड) प्राणी अत्याचार विरोधी कायदा सह कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे हे करत आहेत. पकडलेल्या गोवंशाच्या जनावरांना उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सोडण्यात आले आहे.