आनंदाचा शोध घ्या – ह.भ.प वामन महाराज मुरंबीकर
उदगीर (एल.पी.उगीले) : आयुष्य फार सुंदर आणि अद्भुत आहे.त्यातील आनंदाचा शोध घ्या, परमार्थात भक्तीचा खरा आनंद आहे.दुसऱ्याचे धन आपल्याकडे घेता कामा नये ,नित्य दान, दररोज समाजासाठी थोडा वेळ आणि श्रम या तीन अज्ञाचे पालन केल्यास मनुष्य जन्म सफल होईल, असे निरूपण वामन महाराज मुरंबीकर यांनी श्रीमद् भागवत कथा सप्ताहात केले. शिवाजी सोसायटी उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै.विजयकुमार बाबाराव पाटील शिरोळकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ आयोजित श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. मुरंबीकर महाराज पुढे म्हणाले की,मनुष्य जन्म हा फार दुर्लभ असून,या जन्मात माणसाला परमार्थ करण्याची संधी असते. मात्र मनुष्य परमार्थ न करता संसारात अडकून पडतो. संसार हा क्षणभंगुर असल्याने परमार्थाची साथ धरावी, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी संतोषी माता भजनी मंडळ उदगीर यांचे दररोज हरिपाठ सुद्धा संपन्न होत आहे.यावेळी भगवानराव पाटील शिरोळकर मुख्य संयोजक,शहाजी पाटील शिरोळकर व्यवस्थापक, विश्वंभरराव शिंदे होळकर (मामा), शिवांगी खताळ पाटील यांच्यासह परिसरातील भाविक, भक्त मोठ्या संख्येने या भागवत कथेस उपस्थिती नोंदवून कथा श्रवण करत आहेत.या कार्यक्रमाचा समारोप दिनांक 24 -3- 2024 वार रविवार या दिवशी ह.भ.प वामन महाराज मुरंबीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपन्न होणार असून या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ सर्व उदगीर परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा. असे आवाहन मीनाक्षी पाटील शिरोळकर,विशाल पाटील,विराज पाटील, यांच्या वतीने संपूर्ण पाटील परिवाराने केले आहे. या संगीतमय भागवत कथेस हार्मोनियमची साथ संगत शंकर जाधव यांनी केली तर तबल्याची साथ महादेव भिसे,सहगायक म्हणून लक्ष्मणरावजी धावणे साथ देत आहेत.