शास्त्री विद्यालयात वासंतिक वर्गाचे उद् घाटन संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता नववी मधून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा व वासंतिक वर्गाचे उद् घाटन संपन्न झाले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, प्रमुख अतिथीस्थानी कार्यवाह शंकरराव लासूणे, शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, ज्येष्ठ स्वयंसेवक प्रमोदराव देशपांडे, पालक प्रतिनिधी एकनाथ खोंडे, वर्षा यल्लावाड, मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड, उपमुख्याध्यापक संजयराव कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, माधव मठवाले उपस्थित होते.
यावेळी दहावी सहप्रमुख लक्ष्मी चव्हाण यांनी शालेय जीवनाचे व शालांत परीक्षेचे महत्व प्रास्ताविकातून मांडले. दहावी प्रमुख रामेश्वर मालशेट्टे यांनी वर्षभरातील अभ्यासक्रम , वासंतिक वर्ग व सराव परीक्षांचे नियोजन सविस्तरपणे मांडले.
पालक प्रतिनिधी एकनाथ खोंडे , वर्षा यल्लावाड, संजय वनशेटे यांनी आपल्या मनोगतातून शाळेकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करत पालक म्हणून शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे नमूद केले.
पर्यवेक्षक कृष्णा मारावार यांनी पालकाची भूमिका विशद करत विद्यार्थ्यांची शिस्त ,सवयी व आरोग्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी पालकांना संबोधित करताना विविध उदाहरणे देत पाल्यांवर दबाव न देता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला समजून घेऊन खेळीमेळीत वाढवावे असे सूचविले.
प्रमुख अतिथी स्थानावरून बोलताना सतनप्पा हुरदळे यांनी विद्यार्थी व शाळा यामधील महत्त्वाचा दुवा पालक असल्याचे सांगत आपल्या पाल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सकारात्मक दृष्टीने शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार यांनी दहावीच्या वर्गासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.
सूत्रसंचालन अनिता यलमटे यांनी केले. तर आभार बालाजी पडलवार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता किरण नेमट यांनी कल्याण मंत्राने केली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नववी व दहावीचे सर्व वर्गशिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.