कुणी सालगडी देता का सालगडी ? हंडरगुळीतील शेतक-याचा सवाल
हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : सिमगा ते गुढी पाडवा दरम्यान पंधरा दिवसाचा अवकाश असला तरीही महिनाभरा पुर्वीच या भागातील शेतकरी वर्ग सालगड्यांचा शोध घेत कुणी सालगडी देता का सालगडी? असा सवाल राज्यासह परराज्यातील नातेवाईकांना विचारत आहेत.एकंदरीत नेहमी प्रमाणे यंदा ही सालगड्याला लाखमोलांचा भाव आला असलातरीही सालगडी ठेवत असताना शेतक-यांनी कांही गोष्टी करणे गरजेचे आहे.म्हणजे सालगडी लाखो रुपये घेऊन रातोरात वन टू का फोर म्हणत फरार होणार नाहीत.या करिता सालगड्यांचे आधारकार्डासह सगळा बायोडेटा जवळ ठेवले तर फरार झालेला सालगडी हाती लागतो. शेतीप्रधान देशातील शेतकरी बांधव सतत विविध संकटांचा सामना करत असतात.संकट आणि शेतकरी हे एक अलिखीत समिकरणच बनले आहे.व शेतक-यांप्रती फुकाचा पुळका सगळे पक्ष,नेते दाखवितात.आज शेती ही आतबट्ट्याचाची व ओपन-क्लोज या मटक्याच्या खेळासारखी झाली आहे.तरीही निडरपणे बळीराजा शेती करतोच.यंदा पाडवा तोंडावर आला आहे.तरीही सालगडी मिळत नाहीत. लाख,दिडलाख,दोनलाख देऊनही सालगडी तो पण विश्वासु सालगडी मिळणे महाकठीण झाले आहे.याचे कारण म्हणजे शासनाच्या फुकटात व कमी दामात मिळणा-या सुविधा.या मुळे सालगडी म्हणुन अनेकांना काम करावेसे वाटत नाही.पुर्वी अनेकजण आमच्या पोराला , घरजावयाला साल गडी म्हणुन ठेवा हो.अशी विनंती अनेकजण करताना दिसत होते. आता काळ बदलला तसे सालगडीही बदलले.परिणामस्वरुप लाखो रुपये व अन्य सुविधा देऊन सालगड्याची हाॅंजी-हाॅंजी करण्याची वेळ जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजांवर आली आहे. शेतक-यांनी दक्ष राहून लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे.
कांही वर्षापुर्वी पाडव्यापुर्वीच शेतात नोकरी करणा-याची सुपारी फुटायची व प्रामाणिक व भरोसेमंद सालगडी मिळायचे.मात्र काळ बदलला तशी कांही सालगड्यांची मानसीकताही बदलली.कारण आजकालचे गडी हे पगार ठरताच पाडव्यादिवशी 75 टक्के पगार उचल घेतात.सोबतच मोबाईल पण मालकांकडूनच घेतात.आणि आडला हरी या म्हणी प्रमाणे बिच्चारे शेतमालक वरील सर्व विश्वासाने देतात.आणि यातच शेत मालकांची फसगत होते.कारण दक्ष न राहता.व लक्ष न ठेवता सालगड्याला त्याच्या डिमांड प्रमाणे सगळे मिळाले की,बहूतांश सालगडी रातोरात धूम ठोकतात. तेंव्हा सर्व बाबतीत दक्ष राहुन सालगडी ठेवावा.असे कांही सालगड्यांकडून फसगत झालेले शेतकरी आपापसात बोलताना दिसत आहेत.