लातूर शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवरील 21 अवैध जोडण्या तोडल्या

0
लातूर शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवरील 21 अवैध जोडण्या तोडल्या

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून अवैधरित्या पाणी उपसा करण्यात येत होता. हा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल विभाग आणि लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून 21 ठीकाण्याच्या अवैध जोडण्या तोडण्यात आल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात लातूर ते कळंब तालुक्यातील रांझणी गावापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली असून यापुढेही ही मोहीम सातत्याने राबविली जाणार आहे.
धनेगाव धरणातून लातूर शहराला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत असून या जलवाहिनीला बसविण्यात आलेल्या एअर व्हॉल्व्हमधून काही ठिकाणी अवैध पद्धतीने जोडणी घेवून पाणी उपसा केला जात होता. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत महसूल आणि महानगरपालिकेच्या पथकाने लातूरपासून ते कळंब तालुक्यातील रांझणीपर्यंत जलवाहिनीची तपासणी केली.
या तपासणीवेळी गाधवड येथे 6, तांदूळजा येथे 10 आणि रांझणी येथे 5 अशा एकूण 21 ठिकाणी व्हॉल्व्हमधून अवैध पध्दतीने पाणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सुमारे 10 ते 15 टक्के पाणी गळती होत असल्याचे महानगरपालिका पथकाने सांगितले. यावेळी जेसीबी व इतर यंत्रसामग्रीचा वापर करून या अवैध जोडण्या तोडून टाकण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यातील जलवाहिनीची तपासणीही लवकरच केली जाणार असून यापुढे सातत्याने अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *