एनईपीमुळे मूल्यात्मक शिक्षणाला मदत – प्रा.डॉ.डी.एन.मोरे
उदगीर (एल.पी.उगीले)राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृतिशील ज्ञान, प्रोफेशनल स्किल, संवैधानिक व मूल्यात्मक शिक्षणाला महत्त्व देणारे आहे. शिक्षण हे समाज उपयोगी झाले पाहिजे. शिक्षणातून विद्यार्थ्यांना आपले छंद जोपासता आले पाहिजेत. बहुविद्याशाखीय शिक्षण व संशोधन याचे अध्ययन, अध्यापन हे परिणामकारक होण्यास हे धोरण मदत करेल. पण आज गरज आहे विद्यार्थ्यांमध्ये मूल्यात्मक शिक्षण रूजविण्याची. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे मूल्यात्मक शिक्षण रुजण्यास मदत होईल,असे विचार व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.डी.एन.मोरे यांनी मांडले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण : २०२० या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरूपात करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य
डॉ.एन.जी.एमेकर,उद्घाटक डॉ.अशोक टिपरसे ( सिनेट सदस्य, स्वा.रा.ती. म. विद्यापीठ, नांदेड ), प्रमुख मार्गदर्शक
डॉ.डी.एन.मोरे (सदस्य, व्यवस्थापन परिषद,स्वा.रा.ती.म.विद्यापीठ,नांदेड ) व डॉ. देविदास जी.राठोड ( प्राचार्य, गव्हर्मेंट फस्ट ग्रेड कॉलेज तूरविहाल ता.सिंधनुर जि.रायचूर, कर्नाटक) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकप्रशासन विभागाचे प्रमुख व या चर्चासत्राचे समन्वयक डॉ.लक्ष्मण उलगडे यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला महत्त्व आहे. विकसित भारत व मातृभाषा संवर्धन यावर देखील या धोरणाचा भर आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळेल व विद्यार्थी सक्षमपणे पायावर उभे राहतील. महाविद्यालयाच्यावतीने आयोजित हे चर्चासत्र शासनाला पूरक व स्तुत्य असल्याचे विचार शुभेच्छापर मनोगतात उच्च शिक्षण विभागाचे संचालक, आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी मत व्यक्त केले.
एनईपी ही काळाची गरज आहे. हे स्वीकारल्या शिवाय पर्याय नाही. अशा चर्चासत्राच्या माध्यमातून प्रबोधन होते, असे उद्घाटनपर मनोगतात डॉ.अशोक टीपरसे यांनी मत व्यक्त केले.
दुसरे मार्गदर्शक डॉ.देविदास जी. राठोड म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरण लवचिक आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक व शारीरिक विकासाला चालना देत चांगला माणूस घडला पाहिजे हे या धोरणाचे प्रयोजन आहे. भारतीय संस्कृतीचे जतन व समता प्रस्थापित झाली पाहिजे या दृष्टिकोनातून या धोरणाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीयत्वाची जाणीव करून देणारी आहे. विद्यार्थी व देशाच्या विकासासाठी हे धोरण महत्त्वाचे असल्याचे अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एन.जी.एमेकर यांनी सांगितले. कार्यक्रमास महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा,पंजाब, राजस्थान व आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील प्राचार्य, प्राध्यापक,पालक व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील प्रा.ज्योती संपाळे तर आभार या चर्चासत्राचे सहसमन्वयक प्रा.प्रदीप पत्की यांनी मानले.