स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 4 मोटरसायकल जप्त. आरोपी अटक
लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या संदर्भात तपास करायच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वरिष्ठांचे आदेश तंतोतंत पालन करत आरोपीला अटक करून चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 01/04/2024 रोजी पथकाला माहिती मिळाली की, चाकूर तालुक्यातील मौजे घारोळा येथील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने चोरलेल्या मोटरसायकली घरासमोर लावून त्या मोटरसायकली विकण्याचा प्रयत्न करीत आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 01/04/2024 रोजी सदर पथक मौजे घारोळा तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे पोचून एका घरासमोर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव उद्धव पांडुरंग सूर्यवंशी, (वय 23 वर्ष, राहणार घारोळा, तालुका चाकूर जिल्हा लातूर). असे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटरसायकल 2023 मध्ये चाकूर येथील कोरे हॉस्पिटल समोरून तसेच इतर तीन मोटरसायकली लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे सांगितले
नमूद आरोपीकडून चोरीच्या चार मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 1 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस ठाणे चाकूर येथील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून उर्वरित तीन मोटार सायकल बाबत तपास सुरू आहे.
नमूद आरोपीला पोलीस ठाणे चाकूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड,पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, राजेश कंचे, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.