शेल्हाळ पाटी जवळ क्रुझर व कारचा भीषण अपघात, 13 जण जखमी
उदगीर (एल.पी. उगीले)
उदगीर शहरालगत असलेल्या शेल्हाळ पाटी जवळ शुक्रवारी भर दुपारी क्रूजर व कारचा अपघात झाला. या अपघातात परभणी येथील 13 जण गंभीर जखमी झाले आहेत .यापैकी एक अति गंभीर जखमीस लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परभणी येथील देवदर्शनासाठी निघालेले क्रुझर जीप क्रमांक एम एच 13 एसी 52 17 ही परभणी येथून बासर येथे दर्शन घेऊन उदगीर मार्गे तुळजापूर कडे जात असताना, उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेल्हाळ पाटी जवळ होंडा कंपनीच्या कार क्रमांक एम एच 13 बी एल 12 25 आणि प्रवासी घेऊन जाणारी क्रुझर यांच्यात समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात घडला. या अपघातात क्रुझर चा चालक दीपक मोरे याचा हात तुटून तोही गंभीर जखमी झाल्याने त्याला लातूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमी ज्यांची नावे महादेव पिटलेवाड, सुनिता पिटलेवाड, तारामती कवरे, रेणुका मेतळे, अमोल भुसारे,जयश्री भुसारे, आश्विनी अर्जुने, करण कवरे, मुक्ता पिटलेवाड, गायत्री पिटलेवाड, संदीप पिटलेवाड, गजानन मेताळे अशा बारा जणांना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी हे परभणी जिल्ह्यातील आडगाव, कीर्तीपूर, कुंभारी, गुलकंडे या गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघाताच्या संदर्भात पोलीस विभागाने अत्यंत हलगर्जीपणा दाखवल्याचे बोलले जात आहे. या अपघातानंतर संबंधित गाडीतील प्रवाशांनी 112 नंबर वर कॉल करून अपघाताची माहिती दिली, त्यानंतर या जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोनच्या सुमारास दाखल करण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाकडून पाच वाजता अपघाताची माहिती शहर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली. त्यानंतर संबंधित अंमलदाराने साडेसात वाजता एम एल सी घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशन कडे सुपूर्द करण्यात आली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी या प्रकरणी एमएलसी आल्यानंतर जबाब घेऊन गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले. मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या अपघाताकडे ग्रामीण पोलिसांनी म्हणाव्या त्या दक्षपणे लक्ष दिले नाही. या अपघात प्रकरणी जबाबदारी देण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे हे देखील नॉट रिचेबल आढळून आले. यावरून पोलिसांची उदासीनता दिसून येत होती. त्यामुळे जखमींचे नातेवाईक पोलीस प्रशासनावर संतप्त झाले होते.