कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा येथे ‘बँकिंग क्षेत्रातील नोकरी संधी परिसंवाद’ संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथे नोकरी कक्षामार्फत शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांना ‘बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संकल्प एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. हे कृषी महाविद्यालय सन २००० पासून कृषी क्षेत्रातील विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या समस्यावर कायम कार्यतत्पर असून, शेती क्षेत्रातील विविध संधी ओळखून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. आर्थिक साक्षरता विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, व विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी कोणत्या कोणत्या मार्गाने उपलब्ध आहे. याचा आढावा घेऊन आजचे हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले गेले. संकल्प एज्युकेशन चे गणिताचे तज्ञ प्रा. अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांना केंद्र शासना पासून ते राज्य शासनापर्यंतच्या संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील विविध संधीचे सविस्तर पणे मार्गदर्शन केले. “संधीचं सोनं करून घेण्यासाठी जिद्दीने अभ्यास केल्यास विद्यार्थी हा यशस्वी होतोच, फक्त एकाच परीक्षेवर अवलंबून राहण्यापेक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा आय.बी.पी.एस. असेल यामार्फत अनेक परीक्षा घेतल्या जातात, विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष न करता किंवा या दुय्यम दर्जाच्या न समजता अभ्यास करून नोकऱ्या या मिळवल्या पाहिजेत” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कृषी प्रक्षेत्र अधिकारी या बँकेमधील सेवे संदर्भात प्रा. प्रशांत ढोले यांनी मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रातील केंद्र शासनाच्या विविध कार्पोरेशन व संस्थेमधील नोकरीच्या संधी त्यांनी सांगितल्या. महाराष्ट्रातले बरेच विद्यार्थी या विविध संधी बद्दल जागरूक नाहीत, असे त्यांच्या अभ्यासातून आढळून आल्यामुळे त्यांनी याचा प्रचार व प्रसार करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
या परिसंवादासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. सूर्यवंशी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील व कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. जी. एम. हमाने यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नोकरी कक्षाचे अधिकारी तसेच कीटक शास्त्र विभागाचे प्राध्यापक एस. आर. खंडागळे यांनी केले.