श्यामार्य कन्या विद्यालयात घे भरारी आनंददायी पायाभूत अभ्यासक्रम वर्गाचे उत्साहात उद्घाटन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था द्वारा संचलित श्यामार्य कन्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे भावविश्व घडविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वर्ग 5 वी ते 9 वी या वर्गासाठी “घे भरारी” आनंददायी पायाभूत अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन शामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणी आर्य यांच्या हस्ते करण्यात आले.
या अभ्यासक्रमात पुढील शैक्षणिक वर्षामधील मराठी, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयाचे पायाभूत वर्ग आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, संस्कारपर बोधकथा, संस्कारपर बालचित्रपट, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे , ओरिगामी, स्पोकन इंग्लिश डेमो, संगीत, विविध मैदानी खेळ, नृत्य, नियमितपणे प्राणायाम, वैदिक श्लोकचे पाठांतर इत्यादी नवोपक्रमाचे आयोजन श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणी आर्य, सहसचिव अंजुमनीताई आर्य, मुख्याध्यापिका तृप्ती पंडित यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रास्ताविकामधून श्रीहरी निडवंचे यांनी माहिती दिली.
बालपणातील अनुभवांच्या विस्तृत श्रेणीचा परिणाम सर्वांगीण विकसित प्रौढ व्यक्तीमध्ये होतो. घे भरारी या आनंददायी नवोपक्रमांतर्गत मुलांना इतर मुलांबरोबर, अगदी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील मुलांबरोबरही एकत्र येण्याची संधी असते. मुलांना संगीत, नृत्य, संगणक किंवा चित्रकला यासारख्या विशेष उपक्रमात पाठवले तर त्यांना त्यांची कौशल्ये वाढवण्याची आणि त्यात प्राविण्य मिळवण्याची संधी मिळते, ज्यामुळे भविष्याचा पाया रचला जातो. नियमितपणे सर्व विद्यार्थ्यांनी शंभर टक्के उपस्थित राहून शंभर टक्के लक्ष देऊन आपल्या ज्ञानात व कौशल्यात भर टाकावी असे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थाअध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमाचे आयोजन फक्त एका विद्यालयापुरते मर्यादित न ठेवता सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर खुले ठेवण्यात आलेले आहे. मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक मीडियापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी इच्छुक पालकांनी व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. असे श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती पंडित यांनी आवाहन केले आहे.
उद्घाटन प्रसंगी नवोपक्रमाअंतर्गत संस्कारपर बोधकथा सतनप्पा हुरदळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे तर आभार पर्यवेक्षक प्रवीण भोळे यांनी मानले.