उदगीर विधानसभा मतदारसंघातून काळगे यांना सर्वाधिक मताधिक्य – निवृत्ती सांगवे
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघ हा समाजवादी विचारांचा बालेकिल्ला आहे. मध्यंतरीच्या काळात मोदी लाटेमुळे भाजपने या ठिकाणी पाय रोवले होते, मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 22 हजाराच्या मताधिक्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय बनसोडे यांना विजयी केले. आणि उदगीर हा समाजवादी विचारांच्या लोकप्रतिनिधींना प्राधान्य देतो, हे दाखवून दिले. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळेल. असा विश्वास राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या कार्यालयास भेट देण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मांजरा सहकारी कारखान्याचे संचालक तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक रवी काळे, काँग्रेस पक्षाचे जळकोट तालुकाध्यक्ष मारुती पांडे, राम स्वामी, बालाजी साळुंके, हुडगे आप्पा, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या सल्लागार विधिज्ञ रुक्मिणीताई सोनकांबळे, बागवान बिरादरीचे प्रमुख समदभाई बागवान, संभाजी तिकटे, बंजारा युवा आघाडीचे नेते सुनील चव्हाण, अयाज जहागीरदार, मुकरम जागीरदार, राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बंटी घोरपडे, मुन्ना मदारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना सांगवे म्हणाले की, डॉ. शिवाजीराव काळगे यांना ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे सुखदुःख चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून गेल्या दोन तपा पेक्षा जास्त काळ ते जनतेची सेवा करत आहेत. स्वतः ग्रामीण भागातून असल्यामुळे त्यांना ग्रामीण जनतेची, त्यांच्या प्रश्नांची माहिती आहे. लोक कितीही मोठमोठे आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात लोकांचे अश्रू पुसण्यासाठी सदैव तत्पर असणारे उमेदवार लोकांना हवे असतात, योगायोगाने असाच उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला असल्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्क्याने जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
याप्रसंगी शिवाजी काळगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मी कधीही लोकांना विसरणार नाही. समाजसेवेचा घेतलेला वसा कधीही टाकणार नाही, उदगीर ही उदागिर बाबाची आणि शाहमहम्मद कादरी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली वस्ती आहे. योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता या भूमितील नागरिकात आहे. मी गोरगरिबांचा उमेदवार आहे. एका अर्थाने मी जनतेचा उमेदवार आहे. त्यामुळे जनता प्रचार यंत्रणा हातात घेईल. असा मला विश्वास आहे, असे सांगितले. प्रास्ताविक बंटी घोरपडे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि दलित मुस्लिम ऐक्य संघ समाजवादी विचारांची पेरणी करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभावाची जाण असलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केली जाईल. समाजातील जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि धार्मिक वाद निर्माण करणे असे कृत्य करणाऱ्यांना लोक जागा दाखवतील. असा विश्वासही व्यक्त केला. आभार प्रदर्शन रवी जवळे यांनी केले.