श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या गुणवत्तेची गुढी उंच फडकत राहील – तृप्ती अंधारे
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त कोविड योद्ध्यांचा सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा ज्ञानयज्ञ मागील ७० वर्षांपासून अखंडपणे व आत्मीयतेने सुरू आहे. संस्थेची ही वाटचाल अभिमानास्पद असून या संस्थेच्या गुणवत्तेची गुढी सतत उंच फडकत राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा दि.२८ जून हा वर्धापन दिन.यानिमित्त श्री केशवराज शैक्षणिक संकुलात कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमती अंधारे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष यशवंतराव देशपांडे तावशीकर तर मंचावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे,विद्यासभा अध्यक्ष किरणराव भावठाणकर,डॉ. विश्वास कुलकर्णी,केशवराज विद्यालयाच्या अर्थ समितीचे सदस्य ॲड.जगन्नाथराव चिताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती अंधारे म्हणाल्या की, संस्थेच्या ज्ञानसाधनेच्या सार्थकतेचा हा दिवस आहे. ज्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली तो न विसरता प्रत्येक घटक अखंडपणे कार्यरत आहे. प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव आहे. संस्थेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सौंदर्य,उपक्रमशीलता आणि वेगळेपण जाणवते.संस्थेच्या आजवरच्या यशात प्रत्येकाचा समान वाटा आहे.संस्थेच्या कर्तृत्वाचा हा ठसा असाच वर्धिष्णू होत राहील.विविध आव्हाने समोर असली तरी संस्थेच्या गुणवत्तेची गुढी उंच फडकत राहील,असेही त्या म्हणाल्या. प्रारंभी ॲड.जगन्नाथराव चिताडे यांनी संस्थेच्या वतीने दि.२१ ते २८ जून दरम्यान राबवण्यात आलेल्या योग सप्ताहाची माहिती दिली. दररोज १२०० व्यक्तींनी योग अभ्यास शिबिराचा लाभ घेतल्याचे ते म्हणाले. संस्थेचा परिचय करून देताना किरणराव भावठाणकर यांनी सांगितले की,वर्धापन दिन साजरा करणे म्हणजे आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव ठेवणे होय. शिक्षणाची नेमकी व्याख्या लक्षात घेत वेगळ्या वाटा चोखाळणारी ही संस्था आहे. देशाचा जबाबदार व जागरूक नागरिक घडविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना यशवंतराव देशपांडे यांनी गुणवान व चारित्र्यसंपन्न नागरिक घडवणे हेच कर्तव्य मानून सुरु असणारी संस्थेची वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील,असे मत व्यक्त केले. यावेळी पोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील,किल्लारीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे,पोलीस कॉन्स्टेबल गजानन जाधव,डॉ.सदानंद कांबळे, मनपाच्या सेवेतील परिचारिका सावित्री किरवले, आशासेविका अनुरेखा वाघमारे,मनपाच्या शववाहिकेचे चालक राजकुमार सोंट,जवळपास २३०० कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणारे मुकिंद सरवदे, सामाजिक गरज ओळखून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेणारे डॉ.विश्वास कुलकर्णी, मनपाच्या स्वच्छता कर्मचारी कुसुमताई रसाळ यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. श्रीमती तृप्ती अंधारे ,किरणराव भावठाणकर,यशवंतराव देशपांडे तावशीकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,पुस्तक व उपरणे देऊन या योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्था ध्वजारोहण,प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रल्हाद माले यांनी प्रास्ताविक तर धनंजय कुलकर्णी, आनंदराज देशपांडे, कार्यवाह नितीन शेटे, डॉ.मनोज शिरुरे, अलिशा अग्रवाल, शिवाजी शेंडगे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. श्रीमती कांचन तोडकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संपदा देशपांडे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक शिवाजी शेंडगे यांनी केले.
चौकट…
दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या उपाधिक्षक…
लातूर येथे पोलिस उपाधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती प्रिया पाटील यांनाही यावेळी कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे श्रीमती पाटील यांच्याकडे सध्या गृह विभागाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.श्रीमती पाटील यांचे पती तहसीलदार म्हणून लातूर येथे कार्यरत आहेत.एक गृहिणी म्हणून घराची जबाबदारी सांभाळतानाच कोरोना संकटाच्या काळात पोलीस खात्यात आणि त्यातही गृह विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रीमती पाटील यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.