डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे स्वातंत्र्याची पहाट – भिक्खू पय्यानंद थेरो

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे स्वातंत्र्याची पहाट - भिक्खू पय्यानंद थेरो
लातूर (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माने व कर्तृत्वाने गुलामीची बंधने नष्ट झाली आहेत. भारतीय संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अलौकिक बुद्धीमत्तेची प्रतिभा आहे. त्यांची जयंती ही समस्त बहुजन समाजाची प्रेरणा आहे त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे स्वातंत्र्याची पहाट आहे असे प्रतिपादन भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे पंचरंगी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी भंते बुद्धशील, आमदार अमित देशमुख, सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष जितेंद्र बनसोडे, भीमराव चौदते, अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, मिलिंद धावारे, महाबुद्धवंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीचे सर्व सदस्य व बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छापर संदेश देताना भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, भारत देशाला अखंड ठेवण्यासाठी भारतीय संविधान हे पावलो पावली उपयुक्त सिद्ध झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारत देशासाठी गौरव व अभिमान आहे.