शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यास छत्रपतींचे स्वराज्य निर्माण होईल – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : देशाची सध्याची परिस्थिती पाहता देशाला छत्रपतींच्या स्वराज्याची आवश्यकता आहे. आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शैक्षणिक विचारवंत,लेखक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ. बाबासाहेब अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की,प्रत्येक महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये संघर्ष केला आहे आणि तो संघर्ष समाजाच्या कल्याणासाठी केला आहे. बाबासाहेबांनी इंग्लंडच्या ग्रंथालयात केलेला अभ्यास लक्षात घेता आज आपल्याला सर्व सुविधा आहेत पण वाचन नाही. म्हणून प्राध्यापकांनी वाचन वाढवून बहुश्रुत बनून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, बाबासाहेबां समोर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यचा आदर्श असल्यामुळे मला घटना लिहिण्यासाठी अडचण आली नाही असं बाबासाहेबांनी म्हटल्याचे नमूद केल.
पुढे ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे कुलदैवता संबधीचा उल्लेख करून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन का ? दहनाची ही कारणमीमांसा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी केली.
अब्राहम लिंकन व आंबेडकर आपल्या भाषणात प्राचार्य डॉ.बिरादार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपले जीवन अर्पण केले याच पद्धतीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा आज स्मृतिदिन आहे, त्यांनीही अमेरिकन लोकांना गुलामगिरीतून मुक्ती देण्याची कार्य केले तर डॉ. आंबेडकरांनी दलित – वंचितांना आंधारातून प्रकाशात आणण्याचे कार्य केले, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच डॉ. सतीश ससाणे यांनी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.