मतदार हा लोकशाहीचा राजा आहे -डॉ.गणेश बेळंबे
उदगीर (एल.पी.उगीले)
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले,घटना दिली. स्वातंत्र्य, समता,बंधुता, न्याय हे जीवनमूल्ये सर्वसामान्यांसाठी अर्पण केले. आज आपली लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे मतदाराला खूप महत्त्व आहे. मतदार हा लोकशाहीचा राजा आहे. असे मत बापूसाहेब पाटील महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. गणेश बेळंबे यांनी व्यक्त केले. ते येथील शिवाजी महाविद्यालयात जयंती समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावरील व्याख्यानात व्याख्याते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अरविंद नवले हे होते, तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा व्ही आर भोसले, जयंती समितीचे प्रमुख डॉ एस व्ही शिंदे,डॉ व्ही डी गायकवाड, पर्यवेक्षक जी जी सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक व्हि डी गुरुनाळे यांची होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण, पंचशील याचे डॉ व्ही डी गायकवाड यांनी वाचन केले. पुढे बोलताना बेळंबे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आदीसारख्यांचा आदर्श होता.त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी आपले कार्य केले. बाबासाहेबांनी ज्ञानावर भर दिला, घटनात्मक नैतिकता कशी असावी? याची शिकवण दिली. परंतु असे असतानाही आज आपला समाज आणि लोकशाही धोक्यात आहे. चांगल्या लोकांना जन्म देणारा समाज आज गुन्हेगाराला जन्म देतो आहे. समाजातील विषमता संपत नाही, त्यामुळे सर्वांनी काम करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आर एम मांजरे यांनी तर प्रास्ताविक डॉ व्ही डी गायकवाड यांनी केले. आभार डॉ एस व्ही शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.