विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये पालक-शिक्षक संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात – सुपोषपाणि आर्य
उदगीर (एल.पी.उगीले)
श्यामार्य कन्या विद्यालयामध्ये दहावीचे उन्हाळी अभ्यासक्रम वर्ग चालू आहेत. दहावी इयत्तेतील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व विद्यार्थिनींच्या पालकांचा पालक मेळावा ठेवण्यात आला. या पालक मेळाव्याचे अध्यक्ष श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे संस्थाअध्यक्ष सुपोषपाणि आर्य होते, तर प्रमुख पाहुणे संस्था सहसचिव अंजुमनीताई आर्य, डॉ. धनाजी कुमठेकर, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती पंडित, पर्यवेक्षक प्रवीण भोळे उपस्थित होते.
शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मजबूती आणि फलदायी भागीदारी निर्माण करण्यासाठी विद्यालयामध्ये नियमितपणे वर्गनिहाय पालक मेळावे आयोजित करण्यात यावेत. पालक मेळावा आयोजित केल्याने मुलांमधील अभ्यासू वृत्ती, सकारात्मक शिस्त आणि चांगली वागणूक वाढवण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळते. संस्था पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून सर्व विद्यालयांमध्ये विद्यार्थी गुणवत्तापूर्ण व सर्वगुणसंपन्न बनण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जावेद.शाळेतील विविध उपक्रम आणि शाळेतील विविध स्पर्धा याबद्दल माहिती विजय बैले यांनी दिली.
परीक्षा जवळ येताच विद्यार्थ्यांना अधिक ताण जाणवू लागतो. पण जर त्यांच्याकडे योजना असेल तर त्यांना जास्त काळजी करण्याची गरज नाही. अभ्यासाचे प्रभावी वेळापत्रक बनवण्यासाठी काही नियोजन करावे लागते. विद्यार्थ्यांनी त्यांचे सर्व विषय आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेळा यांची यादी करावी. मग प्रत्येक विषयावर किती वेळ घालवायचा आणि कधी अभ्यास करायचा हे ते ठरवू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक व नियोजन कशा पद्धतीने करावे? यावर सविस्तर माहिती संजीव पाटील यांनी दिली.
श्यामार्य कन्या विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल हा शंभर टक्के असतो. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा मान राखला आहे. मुलींच्या शिक्षणात पालकांची महत्त्वाची भूमिका असते . त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आव्हानांचे निराकरण करणे, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ करणे महत्त्वपूर्ण आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वपूर्ण आहे, असे मुख्याध्यापिका तृप्ती पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. श्यामार्य कन्या विद्यालयामध्ये विविध स्पर्धा आयोजित करून पुढील स्पर्धेच्या युगात कसे टिकावे याविषयी सविस्तर माहिती नेहमी दिली जाते, असे मनोगतातून डॉ. कुमठेकर यांनी मत व्यक्त केले.
विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मिळत असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धा घेतले जातात, त्याबद्दल या विद्यालया संबंधी खूप समाधानी व नशीबवान आहोत , असे पालक शिल्पा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रेश्मा सूर्यवंशी, संतोष जाधव, मारुती कानवटे, पवन मुत्तेपवार, नाथा परगे, शिल्पा लांडगे, बुके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आणि समस्या असतात. विद्यार्थ्यांच्या या समस्यांवर शाळेतील, घरातील किंवा इतर समस्यांवर तोडगा काढला जावा. विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत, कष्ट करण्याची तयारी, विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावे. त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी, उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात प्रावीण्य मिळविण्यात मदत करावी, म्हणजे वेळ वाया जात नाही. यासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करू नये. शिवाय पालकांनी आपल्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. त्याच्या पातळीवर जाऊन, त्याचे मित्र होऊन त्याची आवड, कल जाणून घ्यावा. पालक आणि विद्यार्थी या दोघांत मित्रत्वाचे नाते असावे, असे अध्यक्षीय समारोपातून सुपोषपाणि आर्य यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतनप्पा हुरदळे तर आभार पर्यवेक्षक प्रवीण भोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रम मलकापूरे, संभाजी कोयले, सारिका कुलकर्णी, संगीता खादीवाले ,वैशाली अनकल्ले, स्वाती मरतळे ,मीनाक्षी ऐनिले , शिक्षकेतर कर्मचारी दिलीप वाघमारे यांनी परिश्रम घेतले.