सुशिक्षित वर्गाने लोकशाहीचे पहारेकरी व्हावे – प्रा. सुभाष भिंगे

0
सुशिक्षित वर्गाने लोकशाहीचे पहारेकरी व्हावे - प्रा. सुभाष भिंगे

उदगीर : (एल. पी.उगीले) शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढीसाठी चिंतन, लेखन, संशोधन ही प्रक्रिया सातत्यपूर्ण झाली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही मूल्य प्रत्येकांची जीवनमूल्य झाली पाहिजेत. सुशिक्षणातून दलित, वंचित, शोषितांचे प्रश्न सोडविले गेले पाहिजेत. त्यासाठी सुशिक्षित वर्गाने लोकशाहीचे पहारेकरी व्हावे, असे मत सेवानिवृत्त लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा. सुभाष भिंगे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आणि आजचे वास्तव’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील (व. म.), उपप्राचार्य प्रा. एस. जी. कोडचे (क. म.), पर्यवेक्षक प्रा. जे. आर. कांदे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. भिंगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा सातत्यपूर्ण संशोधनाचा विषय आहे. ते एक अनाकलनीय कर्तुत्ववान व्यक्तिमत्व होते. त्यांनी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले. म्हणूनच त्यांना ज्ञानमार्गी कर्मयोगी म्हणूनही संबोधण्यात आले. ज्ञानाला शिलाची जोड असावी, हा बाबासाहेबांनी दिलेला शैक्षणिक मूलमंत्र सर्वांनी जोपासावा, अशी भावना व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के म्हणाले, ‘शिक्षितांनी कृतीवादी असावे’ अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा न संपणारा शोध आहे. बाबासाहेबांसारखी वर्तनात आणि विचारात फरक नसणारी माणसं अजरामर होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत शिक्षण व्यवस्थाच निर्माण करू शकते. त्यामुळे ही जबाबदारी शिक्षण संस्थांवर आणि शिक्षकांवर आहे, व आपण ती स्वीकारली पाहिजे, असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिव तथा ग्रंथपाल प्रा.डॉ.लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी तर आभार प्रा. नागनाथ खांडेकर यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *