दयानंद शिक्षण संस्थेने मला समृध्द केलं – प्रा.विश्वंभर इंगोले
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून ३५ वर्षे सेवा करुन प्रा. विश्वंभर इंगोले आज सेवानिवृत्त झाले. या प्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी सत्कार करुन निरोप दिला. प्रा. विश्वंभर इंगोले वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक अध्यापनाचे कार्य तर त्यांनी चोख केलेच पण त्यासोबतच आपले कलावंताचे मनही त्यांनी जोपासले. साहित्याचा दर्दी वाचक आणि प्रतिभासंपन्न कवी अशी त्यांची ओळख करुन देता येईल. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, सहज जगणे यातूनच त्यांनी जीवनाबद्दल चिंतन व्यक्त केले – ‘ आयुष्यात रिक्त अवकाश येऊच द्यायचा नसतो.. .नेहमीच ….तो फुलांच्या सुगंधानं भरावा लागतो…!!’ सेवेत असतानाही मी माझा वाचनाचा, काव्यलेखनाचा छंद जपला निवृत्तीनंतरही मी हा आनंद घेणार आहे.
दयानंद शिक्षण संस्थेबद्दल बोलताना त्यांना भरुन आले. ते म्हणाले संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन हे आमचे प्रेरणास्थान आहेत. संस्थेकडे कोणत्याही उपक्रमासाठी गेलो तर उत्साह देऊन ते कार्यपूर्तीसाठी मदत करायचे. त्यांचा पाठिंबा हेच आमचे बलस्थान आहे. त्यांच्यामुळेच आम्ही दरवर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी वैद्यकीय शाखेस पात्र करण्याचे यश गाठू शकलो. निरोप घेताना ते म्हणाले – ” मी जेंव्हा संपूर्ण आयुष्याचा विचार करतो तेंव्हा आंतर्मनातून अगदी स्पष्ट आवाज येतो की , …….एकंदरीत “दयानंद संस्थेनं” मला खूप समृद्ध केलं …. कदाचित माझ्या क्षमतेपेक्षाही मला अधिकच दिलं…. “दयानंद” च्या प्रत्येक घटकांशी… मी अत्यंत कृतज्ञ आहे….!!”दयानंद शिक्षण संस्था आणि संस्थेतील सर्व सहकारी यांच्या स्नेहाबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या भावपूर्ण निरोप कार्यक्रमात दयानंद कला महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिलकुमार माळी,डॉ. प्रदीप सूर्यवंशी, प्रा.डॉ. सुनीता सांगोले, डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. विलास कोमटवाड, कार्यालय अधीक्षक नवनाथ भालेराव, रमेश देशमुख, आदी उपस्थित होते.