आध्यात्मिक सेवा सोबत वैभव सेवा महत्त्वाची – डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर (प्रतिनिधी) : आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सेवेसोबत दुसऱ्यांना आनंद देणारी वैभव सेवा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी नुकतेच केले. बियांड व्हीजन फाउंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड, लातूर क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र, अॅड. धनंजय चिताडे आणि एस. एम. आर. मित्र मंडळाच्या आर्थिक सहकार्यातून लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, मुंबई, पुणे, सोलापूर, धुळे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यासह ग्रामीण भागातील दृष्टी दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक आध्यात्मिक सहलीचे आयोजन दि. २९ मे ते ३ जून २०२४ या कालावधीमध्ये करण्यात आले आहे याचा शुभारंभ कार्यक्रम हॉटेल पार्थ येथे आयोजित करण्यात होता यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
यावेळी विचारमंचावर नॅबचे अध्यक्ष डॉ. विजयभाऊ राठी, श्रीमती गंगाबाई चिथाडे, प्राचार्य डॉ. संजय गवई, अॅड. धनंजय चिथाडे, सामाजिक कार्यकर्ते कालिदास माने, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव गोरे, सचिव संदीप चोपडे, उपाध्यक्ष प्रा. सुशील शेळके, कोषाध्यक्ष मीरा चोपडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, दिव्यांग बंधू-भगिनींची धार्मिक सहल आयोजन करण्यामध्ये मला सहभागी होता आले याचा मला मनस्वी आनंद आहे. या सहलीच्या माध्यमातून दृष्टीबाधित व दिव्यांगांना देव देवतांचे दर्शन होणार आहे. खरे पाहिले तर आपण मंदिरात गेल्यानंतर स्वतःचे डोळे बंद करून दर्शन घेतो व नामस्मरण करतो परंतु दृष्टीबाधित दिव्यांग म्हणून जीवन जगत असताना सातत्यानेच दररोज डोळे मिटलेलेच असल्यामुळे आपण सतत नामस्मरण करतात व ईश्वर प्राप्ती करता. आपल्या दिव्य चक्षूनी या सर्व बाबीचा अनुभव घेता ही बाब महत्त्वाची असून प्रवासा दरम्यान आपण आमच्या सतत संपर्कात राहावे. तिरुपती येथे आपली दर्शन व निवास व्यवस्था ही माजी गृहमंत्री आपले आदर्श शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीने केली असल्याचे सांगून त्यांनी सहलीमध्ये सहभागी झालेल्या दिव्यांग बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रास्ताविक करताना फाउंडेशनचे अध्यक्ष माधव गोरे म्हणाले की, लातूर येथून निघणारी ही सहल रेल्वे मार्गे सोलापूरहून तिरुपतीला दि. ३० मे रोजी पोहोचणार असून तिथे लॉर्ड वेंकटेश्वरा व इतर देव-देवतांचे दर्शन घेऊन दि. ३१ मे रोजी तिरुपतीहून रेल्वे मार्गाने कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. दि. ०१ जून २०२४ रोजी कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन कोल्हापूर परिसरातील इतर आध्यात्मिक स्थळांसह पर्यटन स्थळास भेट देणार आहे. दि. ३ जून रोजी ही सहल कोल्हापूरहून लातूरकडे प्रस्थान करणार आहे. दृष्टी दिव्यांग व अस्थिव्यंग व्यक्तींसह त्यांच्या परिवारातील १०० व्यक्तींचा या सहलीत सहभाग असणार आहे. दिव्यांग व्यक्तींना आध्यात्मिक अनुभव देणे हा या सहलीमागील हेतू आहे. तिरुपती येथील दर्शन व निवास व्यवस्था तथा कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन व निवास व्यवस्था उपलब्धतेसाठी डॉ. अर्चनाताई पाटील आणि अॅड. विक्रमजी पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून देशाचे माजी गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्यास्तरावरून सदर व्यवस्था उपलब्ध करून देण्यात बहुमोल सहकार्य लाभले आहे असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. विजयभाऊ राठी, प्राचार्य डॉ. संजय गवई, सामाजिक कार्यकर्ते कालिदास माने आणि अॅड. धनंजय चिथाडे यांनीही आपली मनोगत व्यक्त करून सहलीत सहभागी होणाऱ्या दृष्टी दिव्यांग व दिव्यांग व्यक्तींना शुभेच्छा व आर्थिक सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदर्शन पाटील यांनी केले तर आभार प्रा. सुशील शेळके यांनी मानले.
या कार्यक्रमाला अॅड. विक्रमजी पाटील, लातूर बस आगार प्रमुख हनुमंत चपटे, सुनील ओझा, प्रवीण मिटकरी, ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, एस.आर.कुलकर्णी, सुभाष चिने, अमोल निलंगेकर यांच्यासह अॅड. धनंजय चिताडे यांचे कौटुंबिक व मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.