कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याच्या मेहनतीचे फळ मिळाले निवृत्ती सांगवे
उदगीर (एल.पी.उगिले) : लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामध्ये ज्या पद्धतीने देशमुख परिवाराने योग्य नियोजन केले, त्याच पद्धतीने महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून दिले. हे यश सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाले. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले.
ते विजयी रॅली नंतर डॉक्टर झाकीर हुसेन चौकामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. याप्रसंगी पप्पू मुळे, वैभव बालूरे, आयत जागीरदार, संभाजी तिकटे, सुनील चव्हाण, कुणाल डोंगरे, शुभम गायकवाड, सुमित वाघमारे, संतोष राठोड, कल्लू कायमसाब इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतीचा वापर करत विजय खेचून आणण्यासाठी सज्ज होतील, असे सांगितले. या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुमित वाघमारे यांनी केले.