महाविकास आघाडी च्या वतीने पंचायत समिती समोर आंदोलन
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या छोट्या-मोठ्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पंचायत समिती समोर आंदोलन केले. शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जनावरांच्या सोयीसाठी गोठ्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना असताना देखील, अर्थकारणामुळे अनेक गोठे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. ज्यांनी पैसे दिले, त्यांची कामे होत आहेत. असा आरोपही आंदोलकांनी जाहीरपणे केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या आंदोलनात उदगीर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील आवलकोंडकर, उदगीर तालुका अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील, शहर कार्याध्यक्ष अजीमोद्दिन दायमी, शहराध्यक्ष गजानन सताळकर, काँग्रेसचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, अजय शेटकार, प्रेम तोगरे, सेवा दलाचे नेते कैलास पाटील, सतीश पाटील मानकीकर, युवराज जोमदे, दयानंद बिरादार, माधव चिमेगावे, प्रशांत गायकवाड, अण्णासाहेब बनशेळकीकर, नामदेव भोसले, विठ्ठल शेळके, अंकुश ताडपले, भास्कर जाधव भाकसखेडा, सौरभ डिगे, अरुण बारदे, महबूब शेख, यांच्यासह काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनाची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने येत्या तीन दिवसात प्रलंबित असलेल्या गोठे आणि विहिरीच्या फाईल च्या संदर्भात निर्णय घेतले जातील, आणि ज्या फाईल मंजुरी योग्य आहेत त्यांना तातडीने मंजुरी दिली जाईल. असे आश्वासन देणारे पत्र शिवाजीराव मुळे यांना देण्यात आले.
पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना लुबाडले गेल्यास किंवा लाच मागून त्यांची कामे प्रलंबित ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशाराही याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश चिटणीस प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे यांनी दिला आहे.