शेतकऱ्यांना लुबाडाल तर धिंड काढणार – मनसे जिल्हाध्यक्ष राठोड
उदगीर (एल.पी. उगिले) : जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी व्यापारी बोगस बियाणे आणि बोगस खते देऊन लुबाडत असल्याच्या घटना घडत आहेत. लातूर जिल्ह्यात जर अशा घटना घडल्या तर, त्यांची धिंड काढली जाईल. असा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी दिला आहे.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राठोड म्हणाले की, पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी व्यापाऱ्यावर विश्वास ठेवून, डोळे झाकून खते, बी बियाणे खरेदी करतो. मात्र त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यापारी सर्रास शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत. परवाच बीड आणि नांदेड जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्राच्या चालक, मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कुपटि येथे बोगस खताच्या सहाशे बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. जवळपास 30 लाख 47 हजारांचा माल जप्त केला आहे.
बोगस बियाणामुळे केवळ शेतकऱ्यांचीच फसवणूक होत नाही तर राष्ट्राचे नुकसान होते. याचे गांभीर्य व्यापाऱ्यांना नाही. असेही प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राठोड म्हणाले. याप्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष संजय रोडगे, तालुका उपाध्यक्ष गंगाधर पिताळे, निरंजन भंडे हेही त्यांच्यासोबत होते.
काही वर्षांपूर्वी उदगीर शहरात बोगस आणि बनावट खते, बी बियाणे, कीटकनाशके विकणाऱ्या शेतकऱ्याची शहरातून धिंड काढली होती. तशीच पुन्हा धिंड काढली जाईल. असा इशारा देतानाच व्यापाऱ्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, किंवा चढ्या भावाने माल विकू नये. तसे निदर्शनास आल्यास त्या व्यापाऱ्यांवर गुन्हे तर दाखल होतीलच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्यांची धिंड काढेल. कृषी विभागाने बियाणी निरीक्षक तथा गुणवत्ता नियंत्रकाचा संपर्क क्रमांक कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावावा. अशी ही मागणी याप्रसंगी संजय राठोड यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना आवाहन करताना शेतकऱ्यांनी संघटित व्हावे, राजकीय गणिते बाजूला ठेवून, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सज्ज राहावे. बियाणे, खते, कीटकनाशके घेत असताना पक्के बिल घ्या, आणि पावती जपून ठेवा. त्यासोबतच खते व बियाणे घेताना ती बॅग सीलबंद आहे का? हे तपासून बघा. तसेच त्यावर वापराची मुदत काय आहे? ते तपासा. इतकेच नाही तर कृषी निविष्ठेचा व्यवसाय करणारा चालक-मालक हा परवानाधारक आहे का? याची खात्री करा. तसेच घेतलेल्या बियाणा पैकी थोडे बियाणे रास होईपर्यंत बाजूला काढून ठेवा. पावती आणि बॅग हेही जपून ठेवा. बॅगवर छापील किंमत असते, त्यापेक्षा अधिक किंमत देऊ नका. जर कोणी अधिक किंमत मागत असेल किंवा व्यापाऱ्यांची फसवणूक झाली असे वाटत असेल तर, लगेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संपर्क साधा. कोणीही चढा भावा ने खते किंवा बियाणे विकत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करा, किंवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगा. ज्या पद्धतीने नांदेड, बीड येथे शेतकऱ्यांना फसवण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत, बळीराजाला लुबाडले गेले आहे, फसवले गेले आहे. तसे प्रकारे लातूर जिल्ह्यात होता कामा नये. याचे गांभीर्य प्रशासनाने ही घ्यावे. असेही आवाहन संजय राठोड यांनी केले आहे.