नेत्रदान ही सामाजिक चळवळ बनावी – डॉ. रामप्रसाद लखोटिया
उदगीर (एल. पी. उगिले) : आपल्या देशातील अंधत्वाचे प्रमाण पाहिल्यास तसेच अंधत्व निवारणाच्या मोहिमेत यश येण्यासाठी नेत्रदान चळवळ ही सामाजिक चळवळ बनावी. अशी अपेक्षा उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयचे अध्यक्ष तथा समाजसेवक डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी व्यक्त केली.
नेत्रदानाच्या संदर्भात दुर्दैवाने आज समाजामध्ये काही अंधश्रद्धा बाळगल्या जात आहेत. वास्तविक पाहता आपण संगणकाच्या युगात वावरत आहोत. त्यामुळे श्रद्धा असाव्यात, परंतु अंधश्रद्धा नसाव्यात. अंधश्रद्धा काढून टाकून नेत्रदानाचा संकल्प लोकांनी केल्यास जे अंध आहेत, त्यांना दृष्टी मिळू शकते. आणि आपल्या डोळ्यांनी ते जग पाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी नेत्रदान एक चळवळ बनवून अंधत्व निवारणाच्या महायज्ञात सहभाग नोंदवावा. असे आवाहन डॉ. लखोटिया यांनी केले. जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईश्वर प्रसाद बाहेती होते, तर इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. शीतल पेद्यावाड, डॉ. मनीषा, डॉ. भाग्यश्री घाळे, योगेश चिद्रेवार, विवेक जैन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अरुणा अभय ओसवाल स्कूल फॉर ब्लाइंड येथील अंध विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणून आपली स्वरसाधना दाखवून दिली. याप्रसंगी अनेकदा त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी सांगितले की, 1982 पासून दृष्टीदान दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो आहे. डॉ. भालचंद्र यांनी जवळपास 80 हजार डोळ्यांचे ऑपरेशन केले. नेत्रदान जनजागृती खूप महत्त्वाचे आहे. डॉ. भालचंद्र यांनी अंध लोकांना दृष्टी मिळवून देण्याचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करून एक आदर्श निर्माण केला आहे. ती सामाजिक बांधिलकी समजून केलेली सुरुवात कुठेही न थांबता अविरत सामाजिक चळवळ बनून चालू राहील. अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन पूजा चालवा यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजेंद्र चव्हाण यांनी केले.