बस चालकास मारहाण प्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास

बस चालकास मारहाण प्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील 5 वे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.वाय.पी.मनाठकर यांनी आरोपी सुनिल अंबादास शेळके व जयराम विनायक लोंढे यांना एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रूपये प्रत्येकी दंडाची शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील श्री.लक्ष्मण एन.शिंदे महमदापूरक यांनी दिली.

घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 19/12/2016 रोजी एस.टी.बस क्रंमाक एमएच-14 बीटी-4321 ही कुर्डवाडी आगाराची बस प्रवासी घेवून बार्शी-मुरूड मार्गे नांदेडला जाणार होती. सदरील बस सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुरूड अकोला शिवारातील दादा पेट्रोल पंपाजवळ आली असता बसच्या पाठीमागुन एम.एच 24 आर-6423 या प्लॅटिनम कंपनीची मोटारसायकलवरून दोन्ही आरोपी आले. सदरील आरोपीनी वरील नंबरची बस
चालवत असलेले ड्रायव्हर नितीन शिवाजी हवलदार यांची बस अडवून तु आमच्या मोटारसायकलला कट का मारलीस असे म्हणुन त्याला बसच्या केबीनमधुन खाली ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शासकीय कामात अडथळा केला म्हणुन एस.टी.चालक नितीन शिवाजी हवलदार यांनी गातेगाव पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिली. त्या तक्रारीवरून वरील दोन्ही आरोपीविरूध्द गु.र.नं.143/2016 कलम 341,353,323,504 सह कलम 34 भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

सदरील गुन्हयाचा तपास पो.हे.कॉन्सटेबल 1302 कोंडामंगले यांनी केला व मे. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सदरील केस मध्ये मुख्यत्वे एस.टी. ड्रायव्हर नितीन हवालदार, एस.टी.वाहक रेवनाथ सुभाष सुतार तसेच सोबत असलेल्या वाहक अनिता वसंतराव सुवर्णकार, पोलीस कॉन्सटेबल अमर वाघमारे, तपासिक अंमलदार सुग्रीव गंगाधर कोंडामंगले यांची साक्ष ग्राहय धरून लातूर येथील 5 वे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.वाय.पी.मनाठकर यांनी दोन्ही आरोपीस वरील कलमान्वये एक वर्षाची सक्त मजुरीची व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा दोन महिन्याची शिक्षा असा निकाल दिला. सदरील प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील लक्ष्मण एन शिंदे (महमदापूरक र)यांनी काम पाहीले व त्यांना सहाकार्य अ‍ॅड.उदय दाभाडे यांनी केले. कोर्ट पैरवीकार म्हणुन पोलीस कॉन्सटेबल राजगीरवाड यांनी काम पाहीले. चौकट-या प्रसंगी प्रसार माध्यमांच्या प्रतिनीधीशी बोलताना अ‍ॅड.लक्ष्मण एन शिंदे (महमदापुरकर) यांनी घटनेबाबत हकीकत सांगुन या निर्णयामुळे शासकीय कामात अडथळा करणार्‍यासाठी न्यायालयाने शिक्षा ठोठावून नवीन वर्षाची सुरूवात केली आहे असे म्हणाले.

About The Author