सीए व त्यांच्या कुटुंबातील १४१ व्यक्तींना लसीकरण
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाचा उपक्रम
लातूर (प्रतिनिधी) : सीए दिनानिमित्त द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या लातूर शाखेच्या वतीने शहरातील सीए व त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.या उपक्रमात १४१ पात्र व्यक्तींना लस देण्यात आली.
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी सीए दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.लातूर शाखेचे अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्या संकल्पनेतून यावर्षीही विविध उपक्रम घेण्यात आले. शहरातील सीए व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोविड प्रतिबंधक लस मिळावी यासाठी ते प्रयत्नशील होते. सीए दिनाचे औचित्य साधून भालचंद्र रक्तपेढी येथे आयोजित शिबिरात हे लसीकरण करण्यात आले. यावेळी लस घेणाऱ्यांना ड्रॅगन फ्रुटचे वाटपही करण्यात आले.
तत्पूर्वी सकाळी सीए दिनानिमित्त दयाराम रोड येथील शाखेच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. दुपारच्या सत्रात ‘सीए व्यवसायाची कोविड पश्चात भविष्यातील परिस्थिती आणि सदस्यांची भूमिका’ या विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए उत्तमप्रकाश अग्रवाल यांनी यात मार्गदर्शन केले.
लातूर शाखेचे अध्यक्ष विशाल चव्हाण,उपाध्यक्ष द्वारकादास भुतडा,सचिव विनोद साळुंके, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राजेश अग्रवाल व सदस्य किशोर भराडिया यांच्या पुढाकारातून हे उपक्रम संपन्न झाले.शहर व परिसरातील सीए,त्यांच्या कुटुंबातील सदस्य,नागरिक व विद्यार्थ्यांनी नी या उपक्रमांचा लाभ घेतला.