घरात घुसून चोरी, कागदाची हेराफेरी ! आरोपी अटक
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील शाहूनगर भागात राहणारे सेवानिवृत्त प्राध्यापक तुकाराम नारायण सरकुटे हे आपल्या पत्नीसह मुलाला भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते. जवळपास एक वर्ष ते अमेरिकेमध्ये होते. या दरम्यानच्या काळात विकास नगर भागात राहणारा लक्ष्मीकांत किशोर पाटील याने तुकाराम सरकुटे हे वयोवृद्ध असून त्यांच्या जवळचे नातेवाईक उदगीर येथे नाहीत. त्याचा गैरफायदा घेत त्यांच्या घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप कशाच्या तरी साह्याने तोडून, कपाटामध्ये असलेल्या भाडे चिठ्ठीवर फिर्यादीच्या संमतीशिवाय फिर्यादीचे नाव, सही व फिर्यादीचा मोबाईल क्रमांक टाकून सदर चिट्टीचे बनावटी करण केले. जेणेकरून भाडेकरू कडून भाडे वसूल करता यावे. तसेच फिर्यादीने कपाटातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे बिस्किट अंदाजे किंमत दोन लाख पंचवीस हजार नमूद आरोपी लक्ष्मीकांत पाटील याने चोरून नेले.
अशा पद्धतीची तक्रार दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं 247/ 21 कलम 454, 457, 380, 467, 468, 506 भारतीय दंड विधान संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील प्रकरणातील आरोपी लक्ष्मीकांत किशोर पाटील यास ग्रामीण पोलिसांनी लगेच अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीला सात जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन, ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण हे अधिक तपास करत आहेत.