मनसे ची लोकप्रियता वाढल्यामुळेच युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित – संजय राठोड.
उदगीर (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणूक उदगीर मनसे ताकदीने लढवणार असल्याचे पक्ष निरीक्षक बाळा शेंडगे यांनी जाहीर केल्यापासून उदगीर मनसेमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. उदगीर सारख्या सीमावर्ती भागात मनसे लोकप्रिय होत आहे. त्यामुळेच युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊन मनसेमध्ये प्रवेश करत आहेत, असे विचार मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मनसेचे पदाधिकारी संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहेत. सध्याची विचित्र राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील तरुणाईला राज ठाकरे हाच विश्वासक चेहरा वाटत असल्याने तरुणाईचा ओघ मनसेच्या दिशांनी येताना दिसून येत आहे. याच अनुषंगाने उदगीर मध्ये जोरदार पक्ष प्रवेश होत असून मौजे कौळखेड येथील तरुणांनी जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला. यात अंकुश चव्हाण,जितू चव्हाण,अविराज चव्हाण, रणजीत चव्हाण,अरुण चव्हाण यांचा सहभाग आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे,शेतकरी सेना तालुकातील बापुराव जाधव, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष दिनेश पवार ,शाखा अध्यक्ष विनोद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.