सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मोर्चा
उदगीर (प्रतिनिधी)
सध्या संपूर्ण देशामध्ये स्त्रीयावर होणाऱ्या अत्याचाराने कळस गाठला आहे. बदलापूर असेल, चाकूर, कोल्हापूर, अकोला असेल येथील लैंगिक अत्याचाराच्या विविध घटना घडल्या आहेत. शासन मात्र या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेत नाही. असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने उदगीर शहरात निषेध मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमून तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून, काळे झेंडे घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारला होता, परंतु न्यायालयाचा सन्मान म्हणून बंद मागे घेण्यात आला. मात्र महिलावरील अत्याचाराचा निषेध करणे हे कर्तव्य समजून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा शीलाताई पाटील, सरोजा बिरादार, ललिता झील्हे ,चारुशीला पाटील, ज्योतीताई बिरादार, ज्योती फुलारी, अनिता गायकवाड, सुनिता फुलारी, धोंडूबाई वाघमारे, शशिकला पाटील, राजश्री पाटील, शिल्पा इंगळे, वर्षाराणी धावारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठेंगेटोल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, विधीज्ञ पद्माकर उगिले, श्रीकांत पाटील, फैजू खान पठाण, अजय शेटकार, नवज्योत शिंदे, सिकंदर शेख, गौतम कांबळे, निलेश विभुते, अविनाश गवते, राजकुमार होळे, बालिका मुळे, काकडे पेंटर, बबन धनबा, विष्णू चिंतलवार इत्यादी प्रमुख नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निषेध मोर्चाच्या नंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे यांनी सांगितले की, आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षित बहीण योजना हवी आहे. या राज्यामध्ये महिलांना सुरक्षितता नाहीत, महिलावर अत्याचार आणि बलात्कार होत आहेत. या घटना थांबल्या पाहिजेत. जनतेला या अकार्यक्षम शासनाची चीड येऊ लागली आहे. सरकारची संवेदनशीलता हरपलेली आहे की काय? महिलावर इतक्या अत्याचार होत असताना देखील गृहमंत्री काय करत आहेत? असा प्रश्नही उषा कांबळे यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, एक मराठी माणूस म्हणून अशा घटना कडे पाहत असताना काळीज पिळवटून निघत आहे. सत्ताधाऱ्यांचे हृदय दगड बनले आहे की काय? अगदी लहान लहान मुलीवर देखील अत्याचार होत आहेत. त्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे, तितकीच गरज त्या कायद्याच्या कठोर अमलबजावणीची देखील आहे. शासन फसव्या घोषणा करण्यामध्ये मग्न झाले आहे. सर्वसामान्य जनते बद्दल विचार करायला त्यांच्याकडे वेळ नाही, प्रचंड महागाई, बेरोजगारी राज्यात पसरली आहे. त्यात आणखी महिला वरील अत्याचारात भर पडत चालली आहे. ही बाब निषेधार्य आहे. म्हणून हा निषेध करण्यात येत आहे. असे स्पष्ट केले.