ठेकेदार व कन्स्ट्रक्शन कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा, मनसेची मागणी
उदगीर (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मोघा ते रावणगाव कि.मी.0/00 ते 7/485 या रस्त्याची सुधारणा करण्याच्या हेतूने नवीन डांबरीकरण रस्ता करण्यात आला आहे. यासाठी अंदाजीत किंमत 474.62 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत, मे 2024 मध्ये या रस्त्याची काम पूर्ण झाले. दोन महिन्यापूर्वी तयार झालेल्या रस्त्याची सध्या परिस्थिती पाहता, हा रस्ता पूर्णतः उघडून गेला असून पुन्हा पुर्ववत खड्डेमय झाला आहे. तरी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता हा रस्ता तयार करताना तीन लेयर मध्ये करावयाचा होता, त्यात सर्वात खाली खोदकाम करून 75 एमएम खडीकरण,50 एम एम एम पी एम व 20 एम एम कार्पेट करणे आवश्यक होते. पण थातूरमातूर खडी करून व्यवस्थित दबई न करता अपुऱ्या डांबरासह एम पी एम करण्यात आले आहे. त्याची जाडी सुद्धा 50 एमएम दिसत नाही, तसेच कारपेट सुद्धा जवळपास 20 एम एम ऐवजी 5 एम एम.चे अत्यंत अल्प डांबर वापरून करण्यात आल्याचे लक्षात येत आहे.
तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम झाल्याने या रस्त्यावरून रहदारी सुरू होताच दोन महिन्याच्या आतच रस्ता पूर्णतः उघडून गेला आहे. व पूर्ववत खड्डेमय झाला आहे. त्यावरून संबंधित ठेकेदाराने आणि कामावर पाहणी करणाऱ्या अभियंत्याने संगनमताने अत्यल्प रक्कम खर्च करून अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करून शासकीय निधीचा अपहार केला आहे. तरी महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2017/प्र.क्र 9/ नियोजन 3 मंत्रालय मुंबई नुसार डांबरी रस्त्याचे आयुर्मान 15 वर्षापर्यंत गृहीत धरण्यात आले असून नियमानुसार काम न केल्यास व नंतर प्रशासकीय मान्यता प्राप्त लांबीत खड्डे पडल्यास, काम खराब झाल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदार व संबंधित पर्यवेक्षक अधिकारी यांची राहील. असे नमूद करण्यात आले असून त्यांच्यावर सिव्हिल व क्रिमिनल स्वरूपाच्या कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
तरी संबंधित परिपत्रकाप्रमाणे सदरील रोडची पाहणी करून संबंधित ठेकेदार, कन्स्ट्रक्शन कंपनी व पर्यवेक्षक अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधित कामावर उचललेल्या बिलाची वसुली करून सदरचा रोड हा पुन्हा तयार करावा. संबंधित ठेकेदार व पर्यवेक्षक अभियंता यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर तीव्र आंदोलन हाती घेईल. आशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, शहराध्यक्ष संतोष भोपळे, तालुका सचिव सुनील तोंडचिरकर,शहर सचिव लखन पुरी,विनोद चव्हाण, आकाश काळे, दयानंद गायकवाड, रत्नदिप डिगोळे,अनिल पटवारी, रोहित गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.