आ. अमित देशमुख म्हणजे सहकारातील कोहिनूर – सौ.उषा कांबळे
उदगीर (एल पी उगिले) काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना परिवारातील विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 तोंडारपाटी, उदगीर येथील कारखान्याला “द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडियाने 2024” या वर्षातील प्रतिष्ठित समजला जाणारा “बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड” जाहीर केला आहे. हा पुरस्कार असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. उदगीरच्या सहकारी साखर कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे देशमुख परिवाराने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या उत्कृष्ट नियोजनाला मिळालेला पुरस्कार आहे. असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ उषा कांबळे यांनी केले. पुढे त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख, सहकार महर्षी माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख आणि आ. अमित विलासराव देशमुख, आ. धीरज विलासराव देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम आहे.
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या वतीने गळीत हंगाम 2023 – 24 साठीचे मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड पारितोषक मांजरा परिवारातील तोंडार ता. उदगीर येथील विलास सहकारी साखर कारखान्यात जाहीर करण्यात आला आहे. या पारितोषकामुळे सहकार आणि साखर कारखानदारीत विलास साखर कारखान्याच्या माध्यमातून मांजरा परिवारातील साखर उद्योगाचा धबधबा निर्माण झाला आहे. साखर उद्योगातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो, आणि तो पुरस्कार उदगीर येथील कारखान्याला मिळाला. हे निश्चितच अभिमानास्पद आहे, कारण या साखर कारखान्याने गेल्या वर्षी झालेल्या गळीत हंगामात कार्यक्षमतेचा जास्तीत जास्त वापर केला. गळीत प्रक्रियेत पाण्याची बचत आणि पुनर्वापर केला, इंधन व ऊर्जेत बचत केली, साखर उताऱ्यात वाढ केली, ऊस तोडणी, ऊस वाहतूक यंत्रणेचा कार्यक्षम वापर केला. तांत्रिक कारणाने कारखाना बंद राहण्याची वेळ राहणार नाही याची काळजी घेतली. ऊस विकास योजना, मनुष्यबळ विकास उपक्रम राबवले. या सर्व कामाची पडताळणी करून कारखान्याची या पारितोषकासाठी निवड करण्यात आली. कारखान्याने गेल्या तीन वर्षात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली, त्याचे मूल्यमापन करून हा पुरस्कार देण्यात आला आहे. या कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. अमित विलासराव देशमुख, विद्यमान चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, वाईस चेअरमन रवींद्र काळे तसेच या कारखान्याचे कार्यकारी संचालक ए आर पवार आणि त्यांचे सहकारी सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने आ. अमित विलासराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सौ. उषा कांबळे मनोगत व्यक्त करताना बोलत होत्या. याप्रसंगी जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, महेश काळे, डॉ. गोविंदराव सोनकांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना उषा कांबळे यांनी सांगितले की, देशमुख परिवाराच्या योग्य नियोजनामुळे संपूर्ण जिल्हा सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर राहतो आहे. मग साखर कारखाने असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल सर्वच क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण करण्याची किमया देशमुख परिवाराने केली आहे. तो आदर्श घेऊन काँग्रेस सक्षमपणे सहकार क्षेत्रात प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितले.