इंदू मिल येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची राज्यपालांनी केली पाहणी,
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती
उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या अनेक वर्षापासून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदु मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे, ही समाजबांधव व आंबेडकर प्रेमी जनतेची मागणी होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरु असुन इंदु मिल येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी स्मारकाची पाहणी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी करुन विविध पदाधिका-यांची बैठक घेवुन सुचना देण्यात आल्या.
यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणाचे वेळी राज्यपालांनी स्मारकाच्या निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्मारकामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी करण्यात येत असलेल्या सोयी सुविधा तसेच स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजना बद्दल त्यांनी माहिती घेतली. इंदू मिल येथील भव्य स्मारकाचा संपूर्ण परिसर हा हरित असेल व तेथे ७५० ते ८०० मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या स्मारक परिसराच्या ठिकाणी १००० व्यक्तींची आसन क्षमता असलेले भव्य सभागृह, चवदार तळ्याचे प्रतिरूप तळे तसेच ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे अशी माहिती यावेळी संबंधितांनी उपस्थित मान्यवरांना दिली.
यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी, आज आपण समाजकारण व राजकारणात केवळ महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळेच असुन त्यांनी दिलेल्या अधिकारामुळेच मी या राज्याच्या कॅबीनेट मंत्री पदापर्यंत पोहचलो आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक येथे होणार असुन आपल्या पुढच्या पिढीला या स्मारकामुळे प्रेरणा व बळ मिळणार असल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.