महात्मा बसवेश्वर हे परिवर्तनवादी सूर्य : विद्यासागर डोरनाळीकर
उदगीर (एल.पी.उगीले) महात्मा बसवेश्वर हे मानवतेच्या कल्याणासाठी लढा देणारे व मानवी मुल्यांना कृतीत उतरविणारे खरे लाढवय्ये समाज सुधारक होते. असे प्रतिपादन ग्रंथ सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यासागर डोरनाळीकर यांनी केले.
उदगीर येथील वीरशैव समाजाच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८५ वा स्मृतिदिनानिमित्त आयोजित ९० वा वचन सप्ताहात तिसरे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विश्वभंर गायकवाड होते. यावेळी विचारपीठावर हणमंतराव औरादे उपस्थित होते. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आपले विचार व्यक्त करताना विद्यासागर डोरनाळीकर यांनी, तथागत गौतम बुध्दानंतर व्यवस्थेच्या व ब्राम्हणशाहीच्या विरोधात क्रांती करणारे खरे पुरोगामी विचाराचे समाजसुधारक महात्मा बसवेश्वर होते. त्यांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून भेदाभेद नष्ट करून, समानतेची संस्कृती निर्माण केली. कर्मकांडाला विरोध करून विज्ञान व विवेक लोकांमध्ये रुजवला असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. विश्वभंर गायकवाड यांनी, कायक वे कैलास व दासोह हे नीट समजून घेतले तर शोषण विरहित समाज निर्माण होईल. आपण बुद्धी व विवेक जागृत ठेवून प्रत्येक गोष्टींची चिकित्सा केली पाहिजे. महापुरुषांचे विचार आचरणात न आणता केवळ ढोंग करणे हे महापुरुषांच्या विचारांची फसवणूक आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडपात पहिल्यांदा लोकशाही रुजवली, व माणसांना माणसाचे हक्क दिले. त्यांनी मानवतेचा पुरस्कार केला, म्हणून ते मानव हिताचे खरे उपदेशक व सुधारक आहेत असे सांगितले.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन अँड. महेश मळगे यांनी केले. आभार प्रा. डॉ. मल्लेश झुंगा यांनी मानले. कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.