संस्कृतीचा प्रवाह जीवनाबरोबर विकसित होतो – डॉ.साहेब खंदारे
उदगीर (एल.पी.उगीले)
अमूर्त संस्कृती लोकसाहित्यातील एक मोठा घटक आहे. निसर्गाचं अवलोकन, आकलन आणि अनुकरण यातून संस्कृती सुरू झाली. जगात शाश्वत विकासासाठी जे प्रयत्न झाले, त्याचे माध्यम अमूर्त संस्कृतीचे संचित आहे. संस्कृतीपासून जीवनाला वेगळे करता येत नाही. कारण संस्कृतीचा प्रवाहचं जीवनाबरोबर विकसित होत असतो, असे विचार लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.साहेब खंदारे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राच्यावतीने ‘अमूर्त संस्कृती संचित ‘ (भाग एक) या विषयावर डॉ.साहेब खंदारे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के उपस्थित होते.सुरुवातीला सदरील विषयावर मुलाखत घेण्यामागची भूमिका डॉ.साहेब खंदारे गौरव समितीचे व मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.कांत जाधव यांनी व्यक्त केली.
मुलाखतीपूर्वी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के म्हणाले, एक संशोधक, वाचक , प्रतिभावंत लेखक व वक्ता म्हणून डॉ.खंदारे यांनी मोठे कार्य केले आहे. आव्हाणात्मक विषयावर संशोधन करून त्यांनी मराठी साहित्य,संशोधन व समीक्षेत भर घातली. प्रा.डॉ.दीपक चिदरवार व डॉ.सुरेश शिंदे यांनी अमूर्त संस्कृतीचा वारसा म्हणजे काय? मूर्त आणि अमूर्त संस्कृती यात फरक काय आहे?अमूर्त संस्कृतीचे वर्गीकरण कसे केले जाते? या प्रश्नावर मुलाखतीत चर्चा केली.यावर डॉ.साहेब खंदारे यांनी उदाहरणासह विस्ताराने स्पष्टीकरण दिले.
मुलाखतीचे ध्वनीमुद्रण अहमदपूर येथील कवी राजेसाहेब कदम यांनी केले. यावेळी परभणी येथील डॉ. सचिन खडके, डॉ. सिंगापुरे तसेच अनंत कदम,डॉ.दिलीप जाधव, प्रा.गोरोबा रोडगे,डॉ.संजय हैबतपुरे व प्रा.उल्हास राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन डॉ.म.ई.तंगावार यांनी तर आभार मराठी विभागाचे प्रमुख डॉ.दीपक चिद्दरवार यांनी मानले.