अंधश्रध्देला बळी पडलेले कुटुंब उध्वस्त होते – रुक्साना मुल्ला
उदगीर (एल.पी.उगीले) कुटुंबात लहान मुलांना बालवयांपासूनच स्त्री-पुरुष भेदाभेद न करता त्यांच्या वैज्ञानिक जाणिवा जागृत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्या कुटुंबांमध्ये अंधश्रध्दा पोसली व वाढवली जाते ते कुटुंब उध्वस्त होते. असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्य सरचिटणीस रुक्साना मुल्ला यांनी केले.
उदगीर वीरशैव समाजाच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८५ वा स्मृतिदिनानिमित्त आयोजित ९० वा वचन सप्ताहात पाचवे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर होते. यावेळी विचारपीठावर वीरशैव समाजाचे सचिव अँड. श्रीकांत बडीहवेली उपस्थित होते. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आपले विचार व्यक्त करताना रुक्साना
मुल्ला यांनी, माणसाच्या कल्याणासाठी विज्ञान आणि विवेकाचा विचार वाढला पाहिजे, व आपण प्रथम माणूस आहोत. याचे भान ठेवले पाहिजे. सर्वच धर्मात अंधश्रद्धा असून अहंकार न बाळगता आपण कार्यकारण भाव शोधले पाहिजेत व चिकित्सा केली पाहिजे. असे सांगून पुरोगामी विचारांचे समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात कर्मकांडाला विरोध करून विज्ञान व विवेक लोकांमध्ये रुजवला असे नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात तहसीलदार राम बोरगावकर यांनी, सर्व धर्मातील महापुरुषांनी मानवतेची शिकवण दिलेली असून बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी मानवधर्म सांगून सामाजिक क्रांती केली आहे. बुद्धांचे पंचशील आणि महात्मा बसवेश्वर यांची वचने ही सारखीच आहेत. माणसाने खोटे बोलू नये, चोरी करू नये, हिंसा करू नये, व्यसन करू नये हीच शिकवण महापुरुषांनी दिली आहे. जातीधर्मांची चौकट मोडून केवळ मानव कल्याणासाठी आपण झटले पाहिजे असे आवाहन केले. प्रत्येक गोष्टींकडे डोळसपणे पहावे. ईश्वर माणसात आहे. माणसातला ईश्वर आपण जोपासला पाहिजे, असेही नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. महेश मळगे यांनी केले. सुत्रसंचालन उत्तरा कलबुर्गे यांनी केले. आभार रविंद्र हसरगुंडे यांनी मानले. कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.