दूध डेरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा — स्वप्निल जाधव
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील शासकीय दूध योजना व दूध भुकटी प्रकल्पाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया शासकीय स्तरावर प्रलंबित आहे. असे असतानाच या प्रकल्पाचे भंगार विक्री करण्याची घाई महाराष्ट्र शासनाकडून केली जाते आहे. उदगीर येथील तरुणांनी भंगार घेऊन जाण्याच्या प्रक्रियेला थांबवले आहे. तसेच शासनाने उदगीरचा दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करून शासनाच्या निदर्शनास हा विषय आणून देण्यासाठी गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी उदगीर येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा असून उदगीरच्या विकासासाठी सर्व तरुणांनी आणि हितचिंतकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केले आहे.
उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पात भंगारात निघाला आहे. शासकीय स्तरावरून निविदा पूर्ण झाली असून छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय कार्यालयाने निविदा काढल्या आहेत. त्यात उत्तम दर म्हणून कोल्हापूर येथील शारदा टेक्नो स्पेशालीटीज कंपनीला निविदा दिली आहे. एक कोटी एक लाख 14 हजार रुपये एवढ्या किमतीला सर्व मशिनरी सह भंगाराची किंमत ठरवण्यात आली आहे.
मात्र काही जाणकार कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अनेक मशनरी या चांगल्या स्थितीत आहेत, काही पार्ट खराब झाले असतील, त्याला भंगार म्हणता येणार नाही. असे स्पष्ट सांगितले आहे. असे असताना सरकारला हा प्रकल्प भंगारात काढण्याची घाई कशासाठी झाली आहे? असा प्रश्नही स्वप्निल जाधव यांनी उपस्थित केला आहे.
कदाचित शहरातील मध्यवस्तीत आलेल्या या प्रकल्पाची मोठी जमीन हडपण्याचा कोणी घाट तर घातला नाही ना? अशी शंकाही जाणकार लोक व्यक्त करत आहेत. असे असले तरीही शासकीय दूध डेरी पुन्हा चालू करावी, अशी अपेक्षा ठेवून दूध योजना पुनर्वसन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा. अशी अपेक्षाही स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केली आहे.
दुर्दैवाने उदगीरच्या नेतृत्वाने नवीन प्रकल्प तर आणलेच नाहीत, उलट असलेल्या प्रकल्पाला भंगारात काढून ते प्रकल्प संपवून टाकायचा प्रयत्न चालवला आहे. असे असले तरी उदगीरच्या जनतेने जोपर्यंत या ठिकाणी नवीन प्रकल्प उभा राहत नाही, तोपर्यंत या प्रकल्पाची मशनरी आणि भंगाराचे साहित्य घेऊन जाऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट निवेदन संबंधित कंपनीला दिले आहे.आणि त्याचाच एक भाग म्हणून 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते शासकीय दूध योजनेच्या प्रकल्पातील मोकळ्या जागेपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर धरणे आंदोलनात होणार आहे. हा प्रकल्प वाचवणे सुजाण नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. ज्या तरुणांनी शासकीय दूध योजना पुनर्वसन समिती स्थापन करून उदगीरच्या हिताचा निर्णय घेतला आहे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे.
शेकडो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न या प्रकल्पातून मिटणार आहे. तसेच उदगीर पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. काही लोक शासकीय दूध डेअरी चालू झाली तर कोणाचा फायदा होईल? असा प्रश्न उपस्थित करून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाचे दुधाच्या संदर्भातले धोरण चुकीचे आहे, असेही सांगितले जात आहे. मात्र ते चुकीचे धोरण बदला असा अट्टाहास धरण्याची हिंमत कोणामध्ये नाही. असेही मत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केले.
शासन शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, शासनातील प्रतिनिधी गप्प आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. ज्याकडे शासन कानाडोळा करत आहे. विम्याचा प्रश्न असेल, शेतमालाचा भाव असेल, शेतमालाचा हमीभाव असेल या गोष्टीकडे सरकार कानाडोळा करत आहे. सोयाबीनचे उत्पादन खाती येत असतानाच केंद्र सरकारने सोयाबीनवर प्रक्रिया केलेले पदार्थ आयात करून एका अर्थाने शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली आहे. या गोष्टीचाही कोणी निषेध करत नाही, हे दुर्दैव आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेकार, बेरोजगार यांच्या प्रश्नाकडे राज्यकर्ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. विकासाच्या नावाखाली चार दोन इमारती बांधल्या आणि लाडका गुत्तेदार सांभाळला म्हणजे विकास नसतो. उदगीर विधानसभा मतदारसंघाला शाश्वत विकासाची गरज आहे. असेही स्वप्निल जाधव यांनी सांगितले.