महात्मा फुले महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन तसेच श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत चालणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात कौशल्य, रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन महाविद्यालयाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते तर महात्मा फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी. आर. काबरा यांच्यासह जिल्हा सेवा योजना विभागाचे समन्वयक दत्तात्रय कांबळे, आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचे समन्वयक खंडोजी टिकोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवात केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी मानले.या ऐतिहासिक ऑनलाइन कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होते.