उदगीरात चाललाय बोगस आणि निकृष्ट कामाचा पॅटर्न – स्वप्निल जाधव

उदगीरात चाललाय बोगस आणि निकृष्ट कामाचा पॅटर्न - स्वप्निल जाधव
उदगीर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदार संघामध्ये बेंबीच्या देठापासून ओरडून जरी विकास झाला, विकास झाला असे सांगत असले तरी, वास्तविक पाहता तो विकास फक्त दलालांचा आणि गुत्तेदारांचा झालेला आहे. कारण मंत्री महोदय सांगतात 6000 कोटींची कामे आणली, ती कोणासाठी? आणि काय कामे केली? असा प्रश्न आता जनतेने त्यांना विचारला पाहिजे. कारण ग्रामीण भागात गावोगावी निधी दिला खरा, मात्र त्याचा उपयोग कितपत झाला? हा खरा प्रश्न आहे. कारण प्रत्येक ठिकाणी झालेले रस्ते चार सहा महिन्यात उकडून जात आहेत. कित्येक कामे बोगस आणि निकृष्ट दर्जाची झाले आहेत.
आता उदगीर शहरातील फुलेनगर भागात मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रतीक्षालयाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बांधकामासाठी उभारण्यात येणाऱ्या पिल्लर मध्ये सळईच नाही, सळई केवळ पिल्लरच्या टोकाला तुकडे उभा करून मध्ये सळई होती, असे दाखवण्याचा भास निर्माण केला आहे. मात्र काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काठीने सळई हलवली असता सळईचे तुकडे गळून पडले. त्या पिल्लर मध्ये सिमेंट ही अत्यंत कमी प्रमाणात वापरले आहे. शिवाय वाळूच्या ऐवजी शिलकोटचा वापर केल्याने अत्यंत तकलादू पद्धतीचे पिल्लर उभा राहिले आहेत. दोन प्रतिक्षालय या स्मशानभूमीत उभारण्यात येत होते, प्रत्येकी 9 लाख 60 हजार प्रमाणे 19 लाख 20 हजार रुपयांचे काम सुरू झाले. मात्र हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर समाज बांधवांनी जाऊन कामाची पाहणी केली, आणि दर्जा हीन आणि निकृष्ट दर्जाचे काम पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हा एक नमुना ठरला आहे. याला विकास म्हणायचे का? अरे कमीत कमी समशानभूमीच्या कामात तरी भ्रष्टाचार करू नका. माणुसकीला जागा, अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांनी थांबण्यासाठी केलेल्या निवाऱ्या च्या ठिकाणी जर निकृष्ट काम करून त्याचा अपघात झाला तर, त्याचे पाप कोणाला लागणार आहे? याचा सारासार विचार करण्याची सुद्धा गरज राज्यकर्त्यांना वाटत नसल्याची खंत युवा नेते स्वप्निल जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी अनेक वाडी, तांड्याला रस्ते नाहीत असे स्पष्ट सांगितले आहे. मात्र ते रस्ते केले म्हणून मोठमोठे बोर्ड लावून नारळ फोडण्यात आले आहे, हा विकास नसून विकासाचा भास निर्माण केला जातोय, असे सांगितले आहे. हे सर्व चित्र लोकांच्या डोळ्यात विकासाच्या नावाने धूळफेक करून दलाल आणि गुत्तेदारांची खिसे भरण्याचे काम झाले आहे. विकास निधी आला म्हणजे कुठून आला? सर्वसामान्य माणसाच्या कष्टाचा पैसा कराच्या स्वरूपामध्ये सरकारने गोळा केला आणि तो पैसा या राजकर्त्यांनी गुत्तेदारांच्या आणि दलाल यांच्या खिशात घातला आहे. याचा हिशोब आता जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही.
मातंग समाजाच्या बाबतीत तर या घोर प्रकारामुळे संपूर्ण समाज चिडलेला आहे. कोणतेही काम घेतले तर अत्यंत दर्जा हीन काम असल्याचे लक्षात येईल. मग अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला विकास म्हणायचं का? काही शादी खाण्याच्या कामाच्या ठिकाणी असाच बोगसपणा होत असताना, एमआयएमच्या नेत्यांनी जाऊन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या ठिकाणचे बोगस मटेरियल तातडीने उचलण्यात आले होते हेही सर्व जनतेने पाहिले आहे.
शिवाय चार-पाच इमारती बांधल्या म्हणजे विकास झाला का? सर्वसामान्य जनतेला त्याचे काय? उलट हा निधी जर रोजगार उपलब्धतेसाठी वापरला असता तर रोजगार मिळाल्यामुळे काही लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटला असता, मात्र सर्वसामान्य जनतेचे यांना काहीही देणे घेणे नाही. त्यांना फक्त आणि फक्त गुत्तेदार आणि दलालांना सांभाळायचे आहे. याच दलालांनी यापूर्वी अनेक नेत्यांना लुबाडलेले लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे आता जनता सावध झाली आहे. अशा निकृष्ट विकासाला थारा देणार नाही, असा मला विश्वास आहे असेही विचार स्वप्नील जाधव यांनी व्यक्त केले आहेत.