उदगीर ची जागा काँग्रेसलाच सोडवून घेणार, उषा कांबळेच उमेदवार राहतील – आ. ए. वसंतकुमार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या तत्त्वानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जात असला तरीही दुसऱ्या एखाद्या जागेची तडजोड करून उदगीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडवून घेतला जाईल. असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे कर्नाटकाचे वर्किंग कमिटी अध्यक्ष तथा लातूर जिल्ह्याचे प्रभारी विधानपरिषद सदस्य आ. ए वसंत कुमार यांनी दिला. ते उदगीर येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या बूथ प्रमुख मेळावा व कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी कर्नाटक काँग्रेसचे प्रवक्ते रज्जाक उस्ताद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंखे, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार उषाताई कांबळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव हुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, ऍड पद्माकर उगिले यांच्यासह उदगीर विधानसभा मतदार संघातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना काँग्रेस पक्षाचे नेते तथा कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आमदार ए. वसंत कुमार त्यांनी स्पष्ट केले की, उदगीर विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्यांची इच्छा काँग्रेस पक्षाचा आमदार हवा अशी आहे. गेल्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा गेली आणि त्या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदाराने गद्दारी केली. त्यामुळे कार्यकर्त्याचे मोठे खच्चीकरण झाले. हे खच्चीकरण भरून काढण्यासाठी आता काँग्रेसलाच उमेदवारी मिळाली पाहिजे, हा अट्टाहास कार्यकर्त्यांचा असणे स्वाभाविक आहे. आज बूथ लेवलवरच्या कार्यकर्त्यांची संख्या पाहिल्यास आणि त्यांचा उत्साह पाहिल्यास ही जागा निश्चितपणे काँग्रेस अगदी सहज जिंकू शकते. महाराष्ट्रामध्ये सध्या परिवर्तनाचे वारे सुरू आहे. जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला होता, मात्र पैसा आणि दबाव तंत्राचा वापर करून महाविकास आघाडीची सत्ता तोडली आणि भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली. हे महाराष्ट्रातील जनतेला बिलकुल आवडलेले नाही. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील विद्वत जनतेने दिला आहे. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेची होणार आहे. गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही, महाराष्ट्राला गद्दार आवडत नाहीत. तसेच ते उदगीरकरांनाही आवडत नाही. त्यामुळे आता उदगीर विधानसभा मतदारसंघ आपण सर्व शक्ती लावून काँग्रेस पक्षासाठी सोडवून घेणार आहोत. त्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे सविस्तर माहिती देणार आहे, आणि काँग्रेस पक्षाला ही जागा सोडउन घेणार तसेच या विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून उषाताई कांबळे याच राहणार, असा विश्वासही ए वसंत कुमार यांनी उपस्थितांना दिला.
याप्रसंगी आपल्या खुमासदार शैलीमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अभय साळुंखे यांनी ही जागा काँग्रेस पक्षाला द्या, काँग्रेस पक्षाचे हित होईल, अशी विनंती केली. तसेच काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, मारुती पांडे, धनाजी जाधव, शीलाताई पाटील यांनीही मागणी केली. या प्रसंगी इच्छुक उमेदवार उषाताई कांबळे यांनी या ठिकाणी काँग्रेसच का पाहिजे? या संदर्भात माहिती सांगताना कार्यकर्त्याचे झालेले खच्चीकरण, काँग्रेसकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा, काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्थेवर असलेली पकड आणि स्वतः राबवलेले विकासात्मक उपक्रम यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
खचाखच भरलेल्या मंगल कार्यालयातील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी काँग्रेसचा जयघोष करून काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकासमोर ही जागा काँग्रेसला सोडली गेली पाहिजे, असा हट्ट धरला. आणि तो हट्ट विचारात घेऊन पक्ष निरीक्षकांनी देखील कार्यकर्त्यांना हिरवा कंदील दाखवला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उषा कांबळे यांनी मतदार संघात गावोगावी जाऊन जनसंपर्क वाढवला आहे. कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे. हे सर्व चित्र पाहिल्यास निश्चितपणे कौल काँग्रेसच्या बाजूने राहील असा विश्वास लोक बोलू लागले आहेत.