कुमठ्याची जि प शाळा अव्वल करण्याचा प्रयत्न राहणार – सुनील केंद्रे
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील मौजे कुमठा येथील जिल्हा परिषद शाळा एक परिपूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित शाळा राहील, या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. एक एक टप्पा पूर्ण करत आज शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मात्र येणाऱ्या काळात ही शाळा अव्वल असेल, या दृष्टीने सर्वांचे सहकार्य घेऊन काम करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
यासंदर्भात पुढे बोलताना ते म्हणाले की, कुमठा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या विकासासोबतच गावचा विकास म्हणजे गावातील विद्यार्थ्यांचा विकास, असा विचार करून पहिल्यांदा शाळेच्या सर्वांगीण विकासाकडे आपण बारकाईने लक्ष दिले पाहिजे असा विचार करून आपण काम केले आहे. त्यामध्ये शाळेतील विद्युत व्यवस्था असेल, शाळेचे कंपाउंड वॉल असेल, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फिल्टरचे पाणीपुरवठा करून आरोग्याची घेतलेली काळजी असेल, बाला उपक्रमांतर्गत शाळेतल्या सर्व खोल्या अंतर बाह्य बोलक्या करण्यात आल्या, त्यासोबतच राष्ट्रीय कर्तव्य म्हणून झाडे लावा झाडे जगवा मोहीम प्रत्यक्ष राबवली, आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये श्रम प्रतिष्ठेच्या विचाराचे बिजारोपण केले. शाळेत शौचालयाचे नवीन बांधकाम केले, शाळेला लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण व्यक्तिशः लक्ष देऊन पूर्ण केल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेला तन-मन-धन लावून सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. या कामी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी मोठे योगदान दिले आहे. या सर्वांच्या मदतीमुळेच आज कुमठा येथील जिल्हा परिषद शाळा “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” महाराष्ट्र शासन टप्पा दोन उपक्रमांतर्गत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. तसेच यामुळे दोन लाख रुपयांचे बक्षीस पात्र ठरली आहे. वास्तविक पाहता जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण गावाच्या विकासाचा खरा केंद्रबिंदू हे जिल्हा परिषद शाळा आहे. प्राधान्य क्रमाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच ग्रामीण भागातील पिढ्या घडत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य रक्षण या गोष्टीकडे सर्वच क्षेत्रातील जसे की राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी विशेष लक्ष देऊन शाळेच्या परिपूर्णतेकडे योगदान द्यावे. असेही आवाहन सुनील केंद्रे यांनी केले आहे.