बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातही लाचखोरीचा रोग जडला !!
कार्यतत्पर संतोष बर्गेच्या पथकाने त्याला वेळीच पकडला !!
लातूर
रोखठोक ऍड. एल. पी. उगीले
खरे तर लातूर जिल्ह्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक म्हणून संतोष बर्गे रुजू झाल्यानंतर, लाचखोरीला बऱ्यापैकी आळा बसला आहे. असे असताना देखील “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” असे म्हणतात, त्याप्रमाणे काही वरिष्ठ आपल्या हाताखालच्या लोकांचा वापर करून लाचेची मागणी करतात, आणि लाच स्वीकारतात ! असे अनेक प्रकार पाहण्यात आले आहेत. वास्तविक पाहता लाखो रुपयांचा पगार असताना देखील अगदी छोट्या छोट्या नोकरीसाठी, मोठमोठ्या अपेक्षा ठेवून लाभार्थ्यांना लुबाडण्यात अशा लोकांना काय आनंद मिळतो? देव जाणे? पण प्रवृत्ती ती प्रवृत्ती असते, स्वभावाला इलाज नाही. असे म्हणतात. तसाच हा प्रकार असावा, गाव पातळीवर अत्यंत छोटं पद म्हणजे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस ! मात्र त्यांच्या निवडीच्या प्रक्रियेत देखील जमलेच तर हात धुऊन घ्यावे, अशी विकृत बुद्धी काही लोकांची होत असते. आणि मग अशा अत्यंत गोरगरीब लोकांना लुबाडण्याच्या प्रयत्नात ते कधी नागवले जातात? हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.
असाच एक प्रकार नुकताच लातूर जिल्ह्यात घडला आहे. यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून हाती आलेली माहिती अशी की, जिल्हास्तरावर गाव पातळीवर शिक्षणाचा स्तर उंचावला जावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा लातूर यांच्या कार्यालयाकडून अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा काढण्यात आल्या होत्या. सदरील रिक्त पदासाठी एक 29 वर्ष वयाची तरुणी पात्र होती. त्यांनी आपल्याला ही नोकरी मिळावी म्हणून नियुक्तीसाठी फॉर्म भरला होता. सदर पदाचा निकाल जाहीर होऊन प्रदर्शित करण्यात आलेल्या निवड यादीमध्ये तक्रारदार यांना प्रतीक्षा यादी मध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदार यांना दिनांक
1 ऑक्टोबर 2024 रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय लातूर येथील आरोपी लोकसेवक भगवान रोहिदास बनसोडे (वय 48 वर्ष, पद शिपाई वर्ग 4, नेमणूक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) जिल्हा लातूर) यांनी औसा जिल्हा लातूर येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून रिक्त पदावर नियुक्ती देणार आहे. असे फोन द्वारे कळवले होते.
सदरील पदाच्या नियुक्तीच्या अनुषंगाने तक्रारदार महिला दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी आरोपी लोकसेवक भगवान बनसोडे यांना समक्ष भेटल्या. तेव्हा भगवान बनसोडे यांनी तक्रारदार यांना सदर पदाच्या नियुक्ती आदेश काढण्यासाठी 80 हजार रुपयाची मागणी केली होती. सदरील रक्कम लाच असल्याचे तक्रारदार युवतीच्या लक्षात आले, तशी त्यांची खात्रीही झाली. तेव्हा त्यांनी समाज हित विचारात घेऊन आणि लातूर विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून स्पष्टपणे 9 ऑक्टोबर 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर येथे या संदर्भात लेखी तक्रार दिली.
या विभागाला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून संतोष बर्गे रुजू झाल्यापासून “झट मंगणी, पट बॅह” या पद्धतीने लगेच त्यांनी आपल्या पथकाला या तक्रारीवर कारवाई करायच्या सूचना दिल्या. वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी शासकीय पंचाच्या साक्षीने लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तेव्हा आरोपी लोकसेवक भगवान बनसोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याकडे नमूद अंगणवाडी मदतनीस पदाचे नियुक्ती आदेश काढण्याच्या कामासाठी 80 हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले, तसेच उर्वरित लाचेची तीस हजाराची रक्कम ही तक्रारदार रुजू झाल्यानंतर देण्याचे मान्य करून ती रक्कम बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय लातूर येथे शासकीय पंचांच्या समक्ष स्वीकारली. आरोपी लोकसेवक बनसोडे यांच्यावर सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेस रंगेहात पकडले. त्यांच्यावर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल केला जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी संतोष बर्गे पोलीस उपाधीक्षक यांच्या सूचनेवरून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर आणि त्यांची पूर्ण टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना वेळीच त्याला आळा घालून लाचखुरीचा किडा दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल समाजामधून या पथकाचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
लातूर विभागातील सर्वसामान्य जनतेसाठी लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, आपल्याकडे किंवा आपल्या ओळखीच्या कुण्या व्यक्तीकडे कोणतेही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही खाजगी इसम, दलाल, एजंट कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्क व्यतिरिक्त जादा पैशाची मागणी करत असेल, किंवा खुशालीची मागणी करत असेल तर तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याशी संपर्क साधावा. तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आश्वासन संतोष बर्गे पोलीस उपाधीक्षक लाच लूचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांनी केले आहे.