आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाला यश ;खंडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे खंडाळी येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्र मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील मौजे खंडाळी या गावात आरोग्य सेवा ही आरोग्य उपकेंद्रावर अवलंबून होती. या ठिकाणी तुटपुंजी आरोग्य सेवा असल्याने नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता. खंडाळी व परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंधोरी अथवा ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे यावे लागत होते. या कालावधीत रुग्णांच्या आरोग्याला होणारा धोका, रुग्णांना लागणारा खर्च व वेळ या अडचणीमुळे नागरिक त्रस्त होते. मागील बऱ्याच वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी खंडाळी व परिसरातील नागरिकांची मागणी होती.तालुक्यातील खंडाळी व परिसरातील आरोग्य सेवा मजबूत व्हावी म्हणून बऱ्याच दिवसापासून आमदार बाबासाहेब पाटील प्रयत्नशील होते. प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे म्हणून त्यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या अप्पर सचिव कविता पिसे यांनी डिजिटल स्वाक्षरी करत मंगळवार ( ता.8) मंजुरी दिली आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहित करून सदर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जिल्हा नियोजन निधीतून करण्यात येणार असून तद्नंतर पदनिर्मितीची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. या प्राथमिक आरोग्याच्या उभारणी नंतर परिसरातील जवळपास 30 गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्याने आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.