बुद्ध लेणी बचाव महामोर्चात जनसागर उसळला !!

0
बुद्ध लेणी बचाव महामोर्चात जनसागर उसळला !!

बुद्ध लेणी बचाव महामोर्चात जनसागर उसळला !!

छत्रपती संभाजीनगर (एल. पी.उगीले) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लगत असलेल्या बुद्ध लेणी, धम्मभूमी बचाव च्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगरात अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला. सर्व आंबेडकरी पक्ष संघटना गट तट सोडून या महामोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम सह अनेक राजकीय पक्षांनी या महामोर्चाला जाहीर पाठिंबा दिला होता. या महामोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळपासून शहराबरोबरच मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने बुद्ध उपासक क्रांती चौकात गोळा होऊ लागले होते. या महामोर्चाच्या मार्गावर विविध पक्ष संघटना आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने मोर्चा मध्ये सहभागी झालेल्यांना चहा, पाणी आणि अल्पउपहाराची व्यवस्था केली होती. शुभ्र वस्त्र परिधान केलेले मोर्चेकरी हातात विविध मागण्यांचे फलक, पंचशील ध्वज घेऊन घोषणा देत शिस्तीत चालत होते. मोर्चा मधल घोषणांनी छत्रपती संभाजी नगर शहर अक्षरशः दणाणून गेले. या महामोर्चाला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने वाहतूक नियमन करण्यात आले होते. तसेच शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळा आणि महाविद्यालयात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ही सहभाग मोठ्या प्रमाणात या मोर्चात दिसून येत होता. क्रांती चौकात भिक्खू संघाकडून उपासकांना सूचना देण्यात येत होत्या. दुपारी एक वाजेच्या समोरास क्रांति चौकातून प्रारंभ झालेला हा महामोर्चा पैठण गेट, टिळक पथ , गुलमंडी, सिटी चौक, शहागंज येथील गांधी पुतळा, हर्ष नगर मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.
बुद्ध लेणी च्या पायथ्याशी मागील 50 ते 60 वर्षापासून असलेले विपश्यना बुद्ध विहार, व भक्कू कुटीला अतिक्रमण ठरवून बेगमपुरा पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा संताप या मोर्चातून दिसून येत होता. विभागीय आयुक्तालयावर हा मोर्चा धडकल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. तेथे काही नेते आणि भिकूंची भाषणे झाली. नंतर भिकू संघाचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर अखिल भारतीय भिकू संघाने बुद्ध वंदना घेतल्यानंतर या महामोर्चाची सांगता झाली.
भंते नागसेन बोधी महाथेरो, भंते संघप्रिय, भंते बोधिधम्म, भंते उपाली, भंते आनंद, भंते निर्वाण यांच्यासह महाराष्ट्रतील बौद्ध भिकू आणि लाखोंच्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका सहभागी झाले होते.
हजार वर्षापासून बुद्ध लेणी अस्तित्वात आहेत. या जागेच्या पायथ्याशी बौद्ध उपासक मोठ्या संख्येने राहतात, व आता हे बौद्धांच्या ऐतिहासिक स्थळ हटविण्याचा काही लोक प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला जात आहे.
महामोर्चा मध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या, बुद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 50 एकर जागा देण्यात यावी, बुद्ध लेणी व परिसराच्या समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा, बुद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा, बुद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धरतीवर प्रकाशयोजना करून लेण्याच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी, ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हरसुल टी पॉईंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी, अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे, महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्यावरील इतर धर्मियांचे अतिक्रमण तात्काळ हटण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्यात इत्यादी मागण्या होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *