दयानंद कला महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षण दिन उत्साहात संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात रविवारी दि.०३ जानेवारी २०२१ रोजी भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती व महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली जोशी व डॉ.सुनिता सांगोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महाराष्ट्रात मुलींसाठी पहिली शाळा काढणाऱ्या, समाजविघातक रूढी बंद करण्यासाठी झटणार्‍या, समाजातील दीन दलितांसाठी झोकून देऊन कार्य करणाऱ्या, पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.अंजली जोशी यांनी असे प्रतिपादन केले की, १८व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला होता. परंतु शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखून महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह मोठी शैक्षणिक कामगिरी बजावली व स्त्री शिक्षणाच्या वाटा खुल्या करण्याचे कार्य त्यांनी केले. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज कार्य करणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, डॉ.सुनिल साळुंके, डॉ.अंजली जोशी, डॉ. सुनिता सांगोले, डॉ. प्रशांत मान्नीकर, डॉ. संदिपान जगदाळे, प्रा. शैलेश सूर्यवंशी, प्रा. महेश जंगापल्ले, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव, रामकिसन शिंदे व कार्यालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.

About The Author