महिलेचे ऑटोमध्ये विसरलेले 7 लाख 70 हजाराचे दागिने पोलिसांनी मिळवून दिले
अहमदपूर (गोविंद काळे) : महिलेचे ऑटोमध्ये विसरलेले सात लाख 70 हजाराचे दागिने पोलिसांनी मिळवून दिले आहे.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, अहमदपूर येथे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सावरकर चौक ते उदयनगर येथे ऑटोद्वारा प्रवास करून गेल्यानंतर ऑटो मधून उतरताना आपली बॅग ऑटोमध्ये आयोध्या कोळेकर या वय 32 राहणार खटकाळी तालुका कळमनुरी येथील महिलेने आपल्या पाहुण्याच्या घरी जाताना विसरले. घरी गेल्यानंतर तिच्या ही बाब लक्षात आली मात्र तोपर्यंत ऑटो निघून गेला होता. याप्रकरणी सदरील महिनलेने पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली त्यानंतर पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. तानाजी आरदवाड व पो. का. पाराजी पुठेवाड यांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ऑटो वरील पांढरी प्लेट व सीएनजी लिहिल्याची माहिती मिळवली यावरून पुढील तपास चालू केला. त्यांच्या बरेच प्रयत्नानंतर गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली व दिनांक 07/11/24 रोजी ऑटो क्र. एम एस 324 ए 4640 च्या मालकास ताब्यात घेतल्यावर विसरलेली बॅग हस्तगत केली. यामध्ये अडीच तोळे सोन्याचे लॉकेट, दीड तोळे सोन्याचे गंठण, सव्वातीन तोळ्याचे नेकलेस, साडेचार तोळ्याचे झुमके व सहा तोळ्याची अंगठी व पन्नास हजार नगदी रक्कम हस्तगत केली. वरील सर्व रक्कम व सोने त्या महिलेचे तक्रारीनुसारच होते त्यानंतर पुढील कारवाई करून अंदाजे सात लाख 70 हजाराचा ऐवज फिर्यादी महिला आयोध्या कोळेकर यांना सुपूर्द करण्यात आला. या पोलिसाच्या कामगिरीचे शहरातून अभिनंदन होत आहे. दागिने परत मिळवून दिल्याबद्दल अयोध्या कोळेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी अहमदपूर पोलिसांचे आभार मानले आहे.
