अकार्यक्षम जिल्हा उपनिबंधकांना काळे फासणार; शेतकरी संघटना

अकार्यक्षम जिल्हा उपनिबंधकांना काळे फासणार; शेतकरी संघटना

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पणन संचालकांना दिला इशारा

लातूर (प्रतिनिधी) : गेल्या तिन-चार वर्षांपासून शेतकरी संघटना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवून कृषी उत्पन्न बाजार समिती अधीनियम १९६३ नियमन १९६७ नुसारच शेतीमालाचा खरेदी- विक्री व्यवहार कराव ही मागणी करीत आहे. परंतू प्रशासन व संचालक मंडळ यावर गंभीर नसल्याने अकार्यक्षम जिल्हा उपनिबंधक यांचे तोंड काळे करुन धिंड काढण्याचे आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पणन संचालकांन‍ा दिला.

राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा खरेदी- विक्री व्यवहार नियमानुसार न करता विविध अनिष्ट प्रथांच्या नावाखाली केला जातो. यामध्ये प्रामुख्याने मुंबई वाशी मार्केटमध्ये रुमालाखालील व्यवहार ज्यामध्ये आडत्या व व्यापारी शेतीमालाची किंमत रुमालाखाली हात धरून करतात.ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री झाल्यानंतर त्यांना भाव कळतो. यानंतर कडधान्य व भूसार मालाची मोठ्या प्रमाणात आवक असलेली बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ‘पोटली’ पद्धतीने शेतकऱ्यांची दररोज लाखो- करोडो रुपयांची लूट केली जाते. यामध्ये बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाची विक्री उघड लिलावाद्वारे न करता दोन ते तिन दुकानात लिलाव करून इतर सर्व माल जो लिलावातील शेतीमालाच्याच दर्जाचा असतो तो लिलावातील मालाच्या किंमतीपेक्षा तिनशे ते चारशे रुपये कमी भावाने खरेदी केला जातो. यासह प्रति क्विंटल दोन ते तिन किलो कडता म्हणून,तर प्रति क्विंटल एक किलो पर्यंत शॅम्पल शेतीमाल घेतला जातो.तर काही ठिकाणी भाव ठरविताना पारशी भाषेचा वापर करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या विरोधात शेतकरी संघटना सातत्याने लढत असून हे बेकायदेशीर प्रकार बंद करण्याची मागणी करीत आहे. यासाठी संबंधित बाजार समित्यांमध्ये, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात, व पणन संचालक कार्यालयात शांततेच्या मार्गाने आंदोलने करुनही यांना शेतकरी लूटीचे गांभीर्य नसेल तर अशा अकार्यक्षम प्रशासकीय प्रमुख असलेले सचिव त्यांच्यावर नियंत्रण न ठेवता त्यांना पाठीशी घालणारे जिल्हा उपनिबंधक यांचे, शेतकरी संघटना कधीही आणि कुठेही तोंड काळे करुन त्यांची गाढवावर धिंड काढेल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पणन संचालक यांना पुणे येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेटून दिला आहे. यावेळी शेतकरी महिला आघाडीच्या सिमा नरोडे, रामेश्वर अवचार सोबत होते. तर लातूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतिने देण्यात आलेल्या निवेदनात ही संघटनेच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक यांचे तोंड काळे करुन गाढवावर धिंड काढण्यात येणार असल्याचे निवेदन पणन संचालक यांना पाठविण्यात आले आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके व कार्याध्यक्ष बालाजी जाधव यांनी प्रसिद्धिस दिली आहे.

About The Author