“आली महागाईची मंदी, बंद झाली चारा चंदी, बेंदराला उपाशी नंदी, कसा पुजू दारामंदी”
(अर्थपूर्ण कवितांनी रंगले राज्यस्तरीय ऑनलाइन कवी संमेलन)
(देवणी) : कोरानाचे संकट, वाढती महागाई, संकटातील शेतकरी, बदलेला माणूस, स्त्री सक्षमीकरणाची गरज शासकीय धोरणातील उणिवा, कृषीकेंद्रित जीवनानुभव अशा विविध अर्थपूर्ण काव्यरचनेचा आस्वाद मराठी काव्यरसिकांना ऑनलाइन स्वरूपात घेता आला. कै. रसिका महाविद्यालय देवणी येथील मराठी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन कवीसंमेलन घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपर्यातून १७ कवींनी आपल्या रचना सादर करून मराठी काव्य रसिकांची दाद मिळवली.
कविसंमेलनाचे उद्घाटन मा.श्री.गोविंदरावजी भोपणीकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.गजाननजी भोपणीकर यांची उपस्थिती होती. कवी संमेलनाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. प्रशांत भंडेे यांनी केले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
सुप्रसिद्ध कवी, चित्रपट गीतकार ज्ञानेश वाकुडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कविसंमेलनात अनेक कवींनी बहारदार रचना सादर केल्या. “छातीवर घेऊन डोके, हृदयाचे मोजत ठोके, छातीवर ठोकत म्हणते, ऐ पत्थर बिलकुल ओके” ही गेयात्म रचना सादर करून कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी पती-पत्नीचे भावबंध शब्दबद्ध केले.
कवी मुकुंद राजपंखे यांनी “मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा, कधीमधी माय बापाला तुझ्या घरी नेत जा, तुझ्या शहरी गरजामधून दहा पाच साठवत जा, दरमहा अर्धी कोर भाकर गावी पाठवत जा” ही रचना सादर करून गाव विसरून शहरात रमलेल्या लोकांचे चांगलेच कान धरले. कवी चंद्रवर्धन लांडगे यांनी चालीवर गीत रचना सादर करून रसिकांची मने हेलावून टाकली. “आली महागाईची मंदी, बंद झाली चारा चंदी, बेंदराला उपाशी नंदी, कसा पुजू दारामंदी, सणादिशी ह्यो वनवास, माझ्या गुरांना मिळना हो घास” असा अर्थ टाहो फोडला. व शेतकऱ्यांच्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. कवी विनायक पवार यांनी आपल्या मुलीवर संस्कार करणारा एक समंजस, जबाबदार बाप आपल्या कवितेतून साकार करून रसिकांच्या अंतःकरणाला हात घातला. “माझ्यासाठी वात पोरी तू पण त्या घरचा दिवा बन, उन्हाळ्यातही झुळझुळणारी थंडगार हवा बन”
कवी शशीकांत हिंगोणेकर यांनी आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेतील संघर्षपूर्ण अनुभव काव्यातून शब्दबद्ध केले. काळजातली माणसे आयुष्यभर जपत राहिलो आणि शेवटी काय झाले, तर अवेळी त्यांचे चेहरेच बदलून गेले. असे अनुभव व्यक्त करून या जीवनसंघर्षात पत्नीच्या साथीने अनेक संकटावर मात केली म्हणून त्यांनी आपल्या अर्धांगिनीला “तू सोडू नकोस, घट्ट धरलेला, माझा हात कधीही, आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झालेय” या रचनेतून साद घातली. जीवनात संघर्ष, कष्ट करणारे आई-बाबा कवी दत्ता जाधव यांनी ‘हिरवी पुण्याई’ कवितेतून रेखाटले. “चोहिकडे हिरवे दाटले, पांग घामाचे फिटले, हिरवाईने बघा माझे, आज वावर नटले” कष्टाच्या घामाने आनंदी झालेले कविमन या कवितेतून प्रकट झाले.
कवी बालाजी इंगळे यांनी “मीडिया,विरोधीपक्ष,सरकारचे धोरण, यातून असतो पाऊस गच्च भरून;फक्त तो भरत नाही, खुरटलेल्या सुकलेल्या पिकाच्या मुळामधून” ही रचना सादर करून दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांचे दुःख व सरकारी धोरणातील कोरडेपणा यावर प्रकाश टाकला. दुःखात जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याच्या मनातील “आता सरेल काळोख, दशदिशा उजळेल, लख्ख प्रकाशाचा थवा, रानोमाळ उतरेल” असा आशावाद कवी संतोष आळंजकर यांनी व्यक्त केला. कवी डॉ.महेश खरात यांनी चूल, मूल, नवरा यांच्यात गुरफटून पडलेली स्त्री स्वतःचं अस्तित्त्व हरवून बसल्याची खंत ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ या कवितेतून व्यक्त केली.
स्त्रीमनाचा उत्कट आविष्कार या कवी संमेलनातून रसिकांना अनुभवता आला. झाडाची पाने, फुले तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करू नका. कर्मकांडात अडकून पडू नका. वट पौर्णिमेच्या सावित्री ऐवजी ज्योतिबाच्या सावित्रीचे व्रत स्वीकारणे ही काळाची गरज आहे. असे सांगताना कवयित्री शैलेजा कारंडे म्हणतात, “तिला सांगावच लागेल, बाई पार्वती, झाडाची पाने नको तोडू, चाळत रहा अखंडपणे पुस्तकाची पानं मग बघ, बघ तुझ्या प्राप्तीसाठी करतील व्रत उपवास, गावागावातील कितीतरी चिरंजीव महादेव”
कवयित्री डॉ. वंदना जाधव यांनी “पूजतोस तू स्त्रीला मंदिरी देवता मानुनी , करतो अत्याचार, झीडकरतोस तू तिला दासी म्हणूनी” या रचनेतून पुरुषाच्या दुटप्पी वर्तनावर प्रहार केले.
आदिवासी समाजातील स्त्रियांचे दुःखीकष्टी जीवन कवितेतून सादर करणारे कवी रामराजे आत्राम यांच्या “माय माझी पोटासाठी रानावनात भटके, पायाला बसती चटके, अंगावर साऱ्या काटेच काटे” या ओळींनी रसिकांना अंतर्मुख केले. कर्मकांडात गुरफटल्यामुळे जीवनाची वाताहत कशी होत गेली हे डॉ. फुला बागूल यांच्या “हे आई….रोज एक तास देवघरात, व्रतवैकल्याऐवजी माझ्या अभ्यासाला दिला असतास, तर ही होळी पेटली नसती” या रचनेतून प्रकट झाले.
“आठवते जेव्हा सर्वकाही मी माझा नसतो, हारल्या हरवल्या क्षणांची मोजदाद करीत नसतो, जिंकण्या हारण्याचा चालतोच आहे लपंडाव, आपणच हरावे असे डावपेच खेळत असतो” या रचनेतून कवी प्रशांत भंडे यांनी जीवनातील संघर्ष शब्दबद्ध करून. इतरांच्या भल्यासाठी स्वतः माघार घेणे हे कधीही चांगले असते हे अनुभव ‘पानझड’ या गझलेतून व्यक्त केले.
प्रा. मारोती कसाब यांनी ‘घर बांधून राहत नसतात दिवस’ या कवितेतून कोरोना संकटावर मात करून जगण्याची उमेद निर्माण करणारा आशय व्यक्त केला. डॉ. अक्षय घोरपडे यांनी ‘आनागामी’ या कवितेतून मुलगी व पित्याच्या नातेसंबंधांना भावस्पर्शी शब्दातून टिपले. कवी सतीश जामोदकर यांनी समाजाला शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची गरज असल्याचे ‘ओबीसींच्या कविता’ या कवितेतून प्रतिपादन केले.
मुकुंद राजपंखे यांच्या सुमधुर आवाजातील “घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळ्मटांना जुन्या जाळले पाहिजे” या गझलेने रसिकांच्या मनात जगण्याची उमेद निर्माण करून कविसंमेलनाचा समारोप करण्यात आला.
उपस्थित कवींचा परिचय प्रा.सौ. अश्विनी देशमुख यांनी करून दिला. कवीसंमेलन यशस्वी होण्यासाठी तांत्रिक सहाय्य रोहित अडीलिंग व डॉ. सचिन चामले, प्रा.महेंद्र आल्टे, प्रा. समाधान पसरकल्ले, श्री. गोविंद सोमवंशी यांनी केले. आभार डॉ. गोपाळ सोमाणी यांनी व्यक्त केले.
या कवीसंमेलनासाठी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. ७०० पेक्षा जास्त रसिकांनी या राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचा आस्वाद घेतला आहे. युट्यूब व गुगल मिटच्या समन्वयातून राज्याच्या विविध भागातून नामांकित कवी व मराठी काव्य रसिकांना एकत्र जोडण्याचे महत्त्वाचे कार्य आयोजकांनी केल्याबद्दल कवी व रसिक वर्गातून आनंद आणि समाधान व्यक्त झाले आहे.