भटक्या श्वानाचा त्रास कमी करण्यासाठी श्वान निर्बिजीकरण शिबिर व प्रशिक्षण फायदेशीर ठरेल – डॉ. अरविंद लोखंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी
उदगीर ( प्रतिनिधी ) : पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर, वर्ल्ड वाईड सर्विस, उटी (तामिळनाडू) आणि नगरपरिषद उदगीर यांचे संयुक्त विद्यमाने श्वान निर्बिजीकरण शिबिर व विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात पदव्युत्तर पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक श्वान निर्बिजीकरणाचे प्रशिक्षण तज्ज्ञांच्या हस्ते दिले जाणार आहे. याकरीता तामिळनाडुतील वर्ल्ड वाईड सर्विस संस्थेचे सर्वसोयीसुविधेने संपन्न वाहन उदगीरात दाखल झाले आहे. उद्घाटन प्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रावजी मुगळे सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक महाविद्यालय, प्रमुख अतिथी व उद्घाटक डॉ. अरविंद लोखंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, लातूर, श्री. भरत राठोड, मुख्याधिकारी नगरषरिषद उदगीर यांचे समवेत आयोजक डॉ. अनिल पाटिल, डॉ. विश्वास साळुंखे, डॉ. मुकेश किनी, वरिष्ठ पशुवैद्यक, वर्ल्ड वाईड सर्विस, डॉ. मीरा मुकाशे, प्रविण ओहळ हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक डॉ. अनिल पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शिबीर व विशेष प्रशिक्षण आयोजनामागची पार्श्वभूमी नमूद करून उपस्थितांचे स्वागत केले. सुत्रसंचालन डॉ. वकार अहमद यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. मुगळे यांनी उदगीर सारख्या छोट्या शहरात अशाप्रकारे प्रशिक्षण व श्वान निर्बिजीकरणाचा प्रयोग ख-या अर्थाने संस्थेचे अधिकारी, विद्यापिठ आणि नगर परिषद उदगीर यांच्या समन्वयातून शक्य झाले असल्याचे म्हटले. शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने उदगीरातील भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण होईल. यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. लोखंडे यांनी भटक्या श्वानाचा त्रास कमी करण्यासाठी श्वान निर्बिजीकरण शिबिर व विशेष प्रशिक्षण निश्चित फायदेशीर ठरेलच आणि त्याबरोबर प्रशिक्षणार्थींना नविन कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देईल. असे सांगितले.
मुख्याधिकारी श्री. भरत राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनात नगर पालिकेतर्फे शिबिरास शक्य ते सर्व मदत करण्याची हमी दिली. वाढत्या भटक्या कुत्र्यांची संख्या व त्यामुळे वाढणारी श्वानदंशाची समस्या यावर नियंत्रण मिळवता येईल. अशी अपेक्षा व्यक्त केली. अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या कर्मचा-याचे कौशल्य विकसित होईल, असे मत त्यांनी प्रकट केले. प्रा. डॉ. विश्वास साळुंखे यानी आभार प्रकट केले.
कार्यक्रमास डॉ. नंदकुमार गायकवाड,डॉ. बापुराव खिल्लारे, डॉ. संजिव पिटलावार, डॉ. नरेन्द्र खोडे, डॉ. विवेक खंडाईत, डॉ. राहुल सुर्यवंशी, डॉ. रविंद्र जाधव, डॉ. सत्यवान आगिवले, डॉ. प्रकाश घुले, डॉ. निलम कुशवाहा यांचेसह महाविद्यालयीन पदव्युत्तर विद्यार्थी, नगरपालिकेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.