नायलॉन मांजा प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 5 हजारांचा मांझाचा साठा जप्त. दोघां विरोधात गुन्हा दाखल
लातूर (एल.पी.उगीले) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडले. या दोघांकडून 05 हजार 365 रुपयांचे नायलॉन मांजा जप्त केला आहे . दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब सरदार शेख (रा. खाडगाव रोड, लातूर) आणि फसीउद्दीन शेख (रा.कंधारवेस, उदगीर) अशी संशयितांची नावे आहेत. शहरात नायलॉन मांजाची विक्री, वापर व साठा करण्यावर प्रतिबंध आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना जीव गमवावे लागले असून, गंभीर दुखापतीही होत आहेत. तसेच पक्षांचेही जीव जात आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी शहरात नायलॉन मांजा विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयितांना पकडले. प्रतिबंधित चायनीज मांजा, नायलॉन मांजा,काचेच्या चुऱ्याचे कोटिंग असलेल्या मांजाचे विक्रेते व वापरणारे यांचेवर होणार कठोर कारवाई.
मकरसंक्रात सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात ठिकठिकाणी पतंग, मांजाची दुकाने थाटली आहेत. या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याचे कोटिंग असलेल्या मांजाच्या विक्रीवर शासनाकडून प्रतिबंध करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासनाचे प्रतिबंध झुगारून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
संपूर्ण लातूर जिल्ह्या मधील पतंग, मांजा ची विक्री करणार्या 83 दुकानदारांना नोटीसा बजावण्यात आल्या असून प्रतिबंधित चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याचे कोटिंग असलेल्या मांजाच्या विक्री करू नये. या बाबत कळविण्यात आले आहे. प्रतिबंधित मांजाची विक्री किंवा वापर करीत असताना मिळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.