स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. 50 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. 11 गुन्हे दाखल
लातूर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकापाठोपाठ एक तपास लावत अवैद्य धंद्यावर ही अंकुश ठेवला आहे. अवैध धंद्यावर कारवाई करत असताना 50 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 11 गुन्हे दाखल करण्यातही या शाखेला यश मिळाले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथके तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
दरम्यान दिनांक 08/12/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका, देशी-विदेशी दारू, हातभट्टी व वाळू यांची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करत एकूण 11 गुन्हे दाखल केले असून मटका, दारू, हातभट्टी व वाळू तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 50 लाख 68 हजार 320 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवैध धंदे करणाऱ्या एकूण 12 लोकाविरुद्ध कार्यवाही करण्यात आली असून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पोलीस पथकांनी केली आहे.